पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हद्दीच्या बाहेर निर्यात करणे हे त्यामानाने बरेच कठीण आणि नाजूक काम आहे. परदेशात नाशवंत मालाची निर्यात होऊ शकते तशीच टिकाऊ मालाचीही निर्यात होऊ शकते. स्थानिक बाजारपेठ, दूरच्या बाजारपेठा आणि परदेशी बाजारपेठा यांना नाशवंत, टिकाऊ किंवा प्रक्रिया केलेला माल पोहोचविणे हे शेतीउद्योगाचे मूळ स्वरूप.
 माल एका जागेहून दुसऱ्या जागी हलविला तर त्याची किंमत वाढते. एका काळातून दुसऱ्या सुयोग्य काळी उपलब्ध केला तरी किमतीत वाढ होते आणि निसर्गदत्त स्वरूपापेक्षा अधिक उपयुक्त स्वरूपात माल बाजारपेठेत नेला, तर त्यासाठी ग्राहक अधिक पैसे मोजायला तयार होतात. सुयोग्य जागी सुयोग्य वेळी माल उपलब्ध करणे यासाठी सगळ्या बाजारपेठेचा चांगला बारकाईचा अभ्यास असला पाहिजे. वाहतूक केल्याने वा साठवणूक केल्याने हातात काय अधिक पडेल व त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेतला तर हातात काय पडेल याचा कसोशीने हिशेब करावा लागतो व पार पाडावा लागतो.
 मारक संतुष्टता
 अलीकडे फळे आणि फुले परदेशांत निर्यात करण्याचा प्रयत्न अनेकजण करीत आहेत. काही जणांनी त्यात मोठे यश मिळवलेले आहे. आता आपल्याला या निर्यात व्यापाराच्या यशाची गुरूकिल्ली समजली, तोच अनेकांच्या बाबतीत त्यांनी उभा केलेला सगळा प्रपंच कोसळून पडत आहे. महाराष्ट्रातील द्राक्षांची बाजारपेठ कसोशीने स्पर्धा करून दुसरे देश बळकावू पाहत आहेत. अपयश का आले हे तपासणे महत्त्वाचे असतेच; पण त्याहीपेक्षा अकस्मात यश का मिळाले याचे कठोर विश्लेषण करणे महत्त्वाचे असते. हिंदुस्थानातील शेतीमालाला बाहेरच्या विकसित देशांत चांगली बाजारपेठ आहे. चांगल्या गुणवत्तेचा माल सातत्याने पुरवत राहिले तर हाती लक्ष्मीच आली असा फाजील विश्वास तयार होतो. देशांतर्गत बाजारपेठा मजबूत करणे यशस्वी निर्यातीसाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने निर्यात क्षेत्रास 'आधी कळस मग पाया रे' असे प्रयत्न झाले आणि आता कोसळलेल्या कळसाखाली चेंगरलेल्यांचा आक्रोश ऐकू येत आहे.
  'सुपर मार्केट'चे महत्त्व

 देशभर बाजारपेठांचे जाळे विणण्याकरिता 'सुपर मार्केटचे जाळे अत्यंत मोलाचे ठरते. पाश्चिमात्य विकसित देशांच्या आश्चर्यजनक प्रगतीचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे तेथील किरकोळ विक्री केंद्रांची अशी जाळी. महाराष्ट्रातील द्राक्षे मोठ्या प्रमाणावर खरीदणारी 'मार्क्स आणि स्पेन्सर' ही अशीच एक व्यवस्था. "गरिबांसाठी

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ५९