रोजी झाली. कामगारांच्या चळवळीचे परंपरेने चालत आलेले हत्यार म्हणजे संप! २० ऑगस्ट रोजी संपाचा अवलंब न करता, देशभर हजारो कामगारांनी 'जेल भरो' आंदोलन केले. राष्ट्रीय मोर्चा आणि डाव्या आघाडीशी संलग्न कामगार संघटनांनी या आंदोलनाचा आदेश दिला होता. आंदोलनाचा हेतू खुल्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याच्या सरकारी धोरणाचा विरोध करणे हा होता. डांगे, फर्नांडिस यांच्या काळात राजकीय हेतूसाठी संप केले जात; पण अशा हेतूसाठी कामगार रस्त्यात उतरत असल्याची ही पहिलीच वेळ. झेंडे तेच जुने; कामगार क्रांतीच्या घोषणा त्याच जुन्या; शोषितांच्या क्रांतीच्या; पण हेतू वेगळा, संघटित कामगारांच्या हितसंबंधाचे रक्षण.
बँकेतील नवे सावकार
बँकेतील कर्मचारी आता काही 'प्रभाकर'कार यांच्या काळच्यासारखे राहिलेले नाहीत. बँकेत नोकरी मिळाली, की पोराने किंवा पोरीने भाग्य काढले असे समजले जाते. त्यातल्या त्यात बँकेतल्याच कोणाशी लग्न जमले म्हणजे तीन कुळांचा उद्धार झाला! मग स्वस्त व्याजाचे कर्ज घेऊन, चांगला फ्लॅट किंवा बंगला बांधणे इ. इ. भविष्याची गडगंज तरतूद करणे यापलीकडे त्यांना दुसरे काम म्हणून राहत नाही. पुण्यात पुष्य नक्षत्राच्या वेळी सोनारांच्या दुकानात सोने खरीदणाऱ्यांची गर्दी बहुतकरून बँकवाल्यांचीच असते. पक्की कायम नोकरी, युनियनची ताकद, यामुळे ग्रहकांची चिंता करण्याचे त्याला काहीच कारण राहत नाही. कर्ज मागायला आलेला प्रत्येक ग्राहक हा वरकमाईचे साधन एवढीच त्यांची दृष्टी असते.
गडगंज पगार मिळवणारे वैमानिक आणि इतर अधिकारी झाडूवाल्याप्रमाणेच संपावर जातात. कोणा वैमानिकाला दारू पिऊन, ड्यूटीवर आल्याबद्दल बडतर्फ केले, तर सगळ्या देशातली विमान्वाहतूक थंडावून जाते. अशा परिस्थितीत बँक कर्मचारी मागे थोडेच राहणार आहेत? त्यांनीही आता शंख फुंकण्यास सुरवात केली आहे. २ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी एक एक दिवसाचा प्रतीकात्मक संप त्यांनी जाहीर केला आहे आणि २ नोव्हेंबरपासून बँक कर्मचारी अनिश्चित कालपर्यंत संपावर जाणार आहेत.
उणे पगाराचे धनी संपावर
कामगारांच्या मध्यवर्ती संघटनांनी ही आंदोलनाची हाक दिली आहे. २५ ऑगस्टला केन्द्रीय कर्मचाऱ्यांनी संघर्ष दिवस पाळला. त्यांची मागणी आहे- महागाई भत्ता मूळ पगारात मिळवण्यात यावा. त्यामुळे सर्व पेन्शनची रक्कम