Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही; पण कारखाना खासगी झाला, तर काम करावे लागेल. टंगळमंगळ काहीही केली, तरी अठ्ठावन्नाव्या वर्षापर्यंत कोणी धक्का लावू शकणार नाही अशी शाश्वती असलेली परिस्थिती हातची सोडायला तो तयार नाही. खासगीकरण झाले, तर स्कूटर खपतील, कारखाना फायद्यात चालेल; पण त्यांची ही ऐश्वर्याची सनद जाईल; म्हणून कामगारांनी भक्कम बांधणी चालविली आहे.
 संध्याकाळच्या भाकरीची खात्री काय, आशाही नाही अशा अवस्थेत देशातील चाळीस टक्के लोक आहेत. अशा परिस्थितीत ऐश्वर्याची सनद राखू पाहणाऱ्या कामगार चळवळीला पुरोगामी म्हणायचे कसे?
 केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी, बँकांतील अधिकारी, आयुर्विमा महामंडळ, इतर वित्तीय संस्था, प्राध्यापक, शिक्षक यांची स्थितीही जवळजवळ अशीच आहे. काम जवळजवळ नाही. कार्यक्षमता जवळपास शून्य. जे काही काम करायचे त्याकरिता लाचलुचपत आणि इतर गैरमार्गांचा सर्रास वापर आणि त्याखेरीज भरभक्कम पगार, निर्देशांकानुसार महागाई भत्ता, वर बोनस, अनेक सार्वजनिक सुट्या, वर पगारी रजा, किरकोळ रजा, आजारपणाची रजा, अभ्यास रजा, वैद्यकीय उपचारांची सोय, निवासाची स्वस्त सोय, सुटीत प्रवासखर्चाची भरपाई, अनेक तऱ्हेच्या कर्जांच्या सोयीसवलती, मुलांच्या शिक्षणाच्या विशेष सोयी, सरकारी खर्चाने भ्रमंतीची-अगदी परदेशी प्रवासाची विशेष सोय व अशा तऱ्हेने नोकरी केल्यानंतर वर निवृत्तीवेतन, प्रॉव्हिडंड फंड आणि मेल्यानंतरसुद्धा कुटुंबाला पेन्शन अशा रेलचेलीत या मंडळींची चंगळ चालू आहे.
 ही काही सगळ्या कामगारांची स्थिती नाही. असंघटित कष्टकरी आजही मोठ्या दैनावस्थेत आहेत. कामगारऐक्याची घोषणा करत स्वतःचे खिसे भरणाऱ्या संघटित कामगारांनी आपल्या धाकट्या, कमजोर भावांच्या संघटना बांधण्याची काही चिंता दाखविली नाही. संघटित ताकदीच्या जोरावर देशाला वेठीस धरणाऱ्या या कामगारवर्गात पत्ते, जगार, दारू बोकाळली आहे. पात्रतेपलीकडे वैभव मिळाले म्हणजे 'देव देव'करण्याकडे कल वाढतो. 'जगातील कामगारांनो, एक व्हा, अशा आरोळ्या ठोकीत संप हरताळ करणारी ही मंडळी जुन्या धर्मरूढींच्या इतकी आहारी गेली आहेत, की जातीयवादी संघटना प्रामुख्याने त्यांच्याच आधाराने उभ्या राहताहेत.

 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी उमेदवार पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊ करतात. महाराष्ट्रात फौजदार म्हणून भरती होण्यासाठी लोक लाखांनी रुपये भरतात. अबकारी खात्यात तर एकएक

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ३५