मंत्रालयातील लढाया लढण्यात भारतीय उद्योजकांचे शौर्य आणि कौशल्य जास्त प्रभावी ठरत होते. गुणवत्तेचे उत्पादन करावे, काटकसरीने करावे, आपल्या मालाला मागणी तयार करावी, ही खऱ्याखुऱ्या उद्योजकाची प्रवृत्ती त्यांच्या परिचयाचीसद्धा नव्हती. दरबारातील वशिल्याने परवाना मिळवावा, मिळालेल्या मक्तेदारीच्या आधाराने खच्चड मालदेखील भरमसाट किमतीत रांगेत ताटकळलेल्या गिऱ्हाइकांना मेहरबानी म्हणून द्यावा असा व्यवसाय त्यांच्या स्वभावास जुळणारा होता. परवानाव्यवस्था टिकली ती तत्कालीन उद्योजकांच्या गरजेपोटी.
समाजवादी ते सिंगापुरी मॉडेल
परकीय भांडवलाची गुंतवणूक आजपर्यंत अगदी मर्यादित ठेवण्यात आली होती. परकीय भांडवलदार, बहुराष्ट्रीय कंपन्या आदी देशात येताच नये. आल्या तर एतद्देशीय कंपनीत त्यांचे भागभांडवल अगदी मर्यादित असले पाहिजे. नाहीतर ही मंडळी देश लुटून नेतील आणि देश आर्थिकदृष्ट्या पुन्हा गुलाम होऊन जाईल असा बागुलबुवा दाखवला जात होता. आता एकदम परदेशीयांच्या गुंतवणुकीकरिता दरवाजे सताड उघडण्याचे प्रयोजन काय आणि रहस्य काय? परदेशी गुंतवणूक वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मालाची स्थिती सुधारेल आणि त्यातून परकीय कर्जाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी शासनाला आशा वाटत असेल; पण या आशेत तथ्य किती आणि भाबडेपणा किती? परकीयांची गुंतवणूकसुद्धा शेवटी फायद्याच्या दृष्टीनेच होणार. हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात गुंतवणूक करण्यात त्यांच्या दृष्टीने आकर्षक भाग एकच, तो म्हणजे भारतातील स्वस्त मजुरी; पण हा एक आभास आहे. भारतात मजुरीचे दर कमी असतील; पण संघटित उद्योगधंद्यातील मजुरांची कार्यक्षमता पाहता स्वस्त दरातील मजुरीही महाग पडते. परकीयांना गुंतवणूक करण्यास दिल्यामुळे एक फायदा होण्याची शक्यता आहे. उद्योगधंदे वाढतील, रोजगार वाढेल, त्याबरोबर भारतात पहिल्यांदाच जुनाट आडगिऱ्हाइकी तंत्रज्ञानापेक्षा जवळपास अद्ययावत तंत्रज्ञान येऊ शकेल. या मार्गाने आशिया खंडातील काही देशांनी एक प्रकारचे वैभव मिळवले आहे. तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांतील उद्योगंदे पाश्चिमात्य उद्योगधंद्यांचे पूरक म्हणून भूमिका बजावतात. अर्थमंत्र्यांनी एका मुलाखतीत सिंगापूरच्या नमुन्याचे कौतुकसुद्धा केले. म्हणजे आता स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्वदेशी भारतीय उद्योगधंद्याचे स्वप्न मिटले आहे. तथाकथित समाजवादी नियोजन बाजूला पडले. आता खंडप्राय भारतवर्ष चिमुरड्या सिंगापूरचा नमुना वाखाणू लागला आहे.