पण ते बिलकूल खरे नाही. कांदे आणि बटाटे यांच्या संबंधाची बाजारातील ताजी आकडेवारी पाहिली, तर या मालाचा बाजारात समाधानकारक - गरजेहून अधिक पुरवठा असूनसुद्धा त्यांच्या किमतीत वाढ होणे चालूच आहे. त्यावरून, कृषिमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते असे लक्षात येईल.
संपुआ सरकारने उत्पादक घटकांना आनुषंगिक चालना न देताच, 'सर्वसमावेशक विकासा'च्या नावाखाली अनर्जित पैसा लोकांच्या हाती देऊन, बाजारातील एकूण मागणी फुगवली हेच खरे तर अन्नधान्याचा महागाईचे कारण आहे. संपुआच्या अर्थमंत्र्यांची हे कबूल करण्यात अर्थातच पंचाईत होईल. 'आम आदमी'ने संपुआला राजकीय घबाड मिळवून दिले. त्यामुळे साहजिकच आता 'आम आदमी'चे भजन बंद करणे संपुआच्या नेत्यांना अवघडच वाटणार.
आजच्या अर्थमंत्र्यांचे पूर्वज सध्या नक्षलवाद्यांचा पाठलाग करण्यात व्यग्र आहेत. त्यांचे वारस म्हणजे वर्तमान अर्थमंत्री यांच्यावर अर्थसंकल्प सादर करताना, मुळात त्यांनी न मांडलेल्या भूमिकांचे समर्थन करण्याची जबाबदारी पडणार आहे.
(६ जानेवारी २०१०)