व्यवस्थेतील 'स्वस्त धान्य दुकानातील किमतीसुद्धा मालाचा पुरवठा आणि मागणी यांच्या एकंदर परिस्थितीनेच ठरतील.
पुरवठा आणि मागणी यांच्या ताकदींमधील 'ढळलेला समतोल' साठ्याची हेराफेरी आणि किंमत यांच्यातील दुष्टचक्रास कारणीभूत होतो. या दुष्टचक्रात किमती वाढू लागल्याष्ट्र की बाजारपेठेच्या अर्थशास्त्राविषयी अनभिज्ञ असणारांचा असा समज होतो, की महागाई साठेबाजीमुळे वाढली आहे. अशा परिस्थितीत सट्टेबाज बाजारपेठेची - मग ती वायदेबाजाराच्या स्वरूपातील असो की शंभर टक्के रेशनिंगच्या व्यवस्थेतील असो - कोंडी करण्याचा प्रयत्न करतात.
सर्वसाधारण अनुभव आणि गृहीतही असे आहे, की बाजारपेठेतील पुरवठा आणि मागणीचा तोल ढळला, की सदा सर्वकाळ, बऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्याच किमती गगनाला भिडतात.
आज ग्राहकाला गगनाला भिडलेल्या बाजारभावांना प्रत्यक्षात सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा अन्वयार्थ कसा लावायचा? तूरडाळीची किंमत ४७.५४ टक्क्यांनी वाढली आहे. १ ऑगस्टपासूनच्या आठवडाभरातच किमती सर्वसाधारणपणे ४० टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. किमतीतील ही शीघ्रगतीची वाढ संयुक्त पुरोगामी आघाडीच्या 'समावेशक विकासा'च्या धोरणामुळे झाली आहे, असा माझा दावा आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी मंदीवर उतारा म्हणून वेगवेगळी पॅकेजेस, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व संपुआचे इतर कार्यक्रम यांच्या माध्यमांतून होणारी निधीची खैरात, सहाव्या वेतन आयोगाने केलेली पगारवाढ आणि अनेक प्रकल्प व धोरणे मोठ्या तडफेने पुढे रेटीत आहे आणि परिणामतः सर्वसामान्य जनतेच्या - संपुआच्या भाषेत 'आम आदमी'च्या - हाती अनर्जित रोख रक्कम सोपवीत आहे. वर्षानुवर्षे कनिष्ठ दर्जाचे जीवनमान जगत असलेल्या आणि प्रचंड प्रमाणात वैतागलेल्या 'आम आदमी'च्या मनी बऱ्यापैकी खर्चीक आणि आरामदायी जीवन जगण्याची आस असणार, हे सिद्ध करण्याची काही गरज नाही.
कारखान्यांतील कामगाराच्या हाती अनपेक्षितपणे वाढीव रक्कम येते, तेव्हा अधिक काळ सुटीवर जाण्याची आणि मौजमजा करण्याची त्याची प्रवृत्ती असते, हे अनेक सामाजिक सर्वेक्षणांनी आणि अभ्यासांनी दाखवून दिले आहे. मुंबई आणि सोलापूरमधील गिरणी कामगार त्यांच्या हाती बोनसची रक्कम पडताच सगळेच्या सगळे आपापल्या गावी जातात आणि बोनसची जवळजवळ सगळी रक्कम संपेपर्यंत तिकडेच राहतात.