Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नावाने खर्च करावयाचा या अर्थसंकल्पात दाखविण्यात आला आहे.
 अशा तऱ्हेचे कार्यक्रम हाती घेतले, विशेषतः रोजगार हमीसारखे कार्यक्रम हाती घेतले, तर त्यामुळे मंदीची लाट थोपविण्यास मदत होते, हा १९३० सालच्या मंदीच्या वेळचा अनुभव आहे.
 परंतु हिंदुस्थानातील परिस्थिती खूपच वेगळी आहे. येथे सर्वसामान्य माणसाच्या नावाने खर्च करण्यासाठी तिजोरीतून काढलेला पैसा सामान्य माणसाच्या हाती न जाता, तो प्रामुख्याने नोकरशहांच्या हाती जातो आणि त्यामुळे ग्राहकाच्या बाजारपेठेमध्ये उतरणाऱ्या ग्राहकाच्या हाती फारच थोडा पैसा प्रत्यक्ष येतो. कै. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी उघड केले होते, की दिल्लीच्या खजिन्यातून गरिबाच्या नावाने बाहेर पडलेल्या एक रुपयातील जेमतेम फक्त ३५ पैसेच त्याच्यापर्यंत पोहोचतात. आता तर दिल्लीमध्ये आम आदमीच्या नावाने ६५ रुपये खर्च झाले, तर त्यातील केवळ १ रुपया आम आदमीपर्यंत पोहोचतो. नियोजन आयोगाच्या एका समितीच्या या अभ्यासाच्या आधाराने पाहिले, तर या अर्थसंकल्पात आम आदमीच्या नावाने खर्चासाठी तरतूद केलेला हा पैसा म्हणजे केवळ नोकरशाहीला खुश करण्यासाठी केलेली व्यवस्था आहे असेच म्हणायला पाहिजे.
 अर्थसंकल्पाच्या दोन दिवस आधीपर्यंत साऱ्या हिंदुस्थानात पावसाचा तुटवडा होता. आज मुंबईत तरी पाऊस चालू झाला आहे, महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडत आहे; पण एवढ्यातच वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या दोन दिवस आधी शेतकऱ्यांची आणि साऱ्या देशाचीच जी काही मानसिक स्थिती झाली होती, तिचा विसर पडू देणे योग्य झाले नाही. वित्तमंत्र्यांनी याबाबतीत संपूर्ण काणाडोळा केला आहे.
 जागतिक उष्णतामान वाढते आहे, हवामानात बदल होतो आहे. त्यामुळे पावसाळा यंदा गेल्या वर्षीपेक्षाही उशिरा चालू झाला; पुढच्या वर्षी, कदाचित, याहीपेक्षा आणखी उशिरा चालू होईल आणि जेव्हा पावसाळा चालू होईल तेव्हा ४५ अंशांच्या पलीकडेसुद्धा तापमान गेलेले असेल. नेहमीच्या ऋतुचक्राप्रमाणे जून महिन्यात जेव्हा पाऊस येतो तेव्हा जमिनीला फूल (वाफसा) येते. म्हणजे, उष्णतामान आणि पाऊस यांचे एक विशेष मिश्रण देशात वर्षानुवर्षे शेतीला मदत करीत आहे. हवामानातील बदलामुळे ही परिस्थिती बदलली, तर यापुढे आलेल्या पावसामध्येसुद्धा पेरणी करता येईल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे.

 कसेही झाले तरी एकूण पावसाच्या रूपाने ढगांतून पडलेले पाणी नद्यांतून समुद्रात जाणार, समुद्रातून ढग होऊन पुन्हा पाणी बरसणार या निसर्गचक्राच्या पलीकडे जाऊन, काही पाणी आणि त्याचा पुरवठा वाढविण्याची शक्यता नाही.

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १५७