Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असताना, त्यांनी हे विधान दूर स्पेनमधील माद्रिद येथे केले. संसदेचे कामकाज सुरू असताना मंत्र्यांनी संसदेबाहेर धोरणात्मक घोषणा करणे या सदरात वित्तमंत्र्यांची ही कृती मोडते. संसदेच्या विशेषाधिकाराचा हा सरळसरळ भंग आहे. त्यांच्या कृतीबद्दल संसदेत मांडलेला हक्कभंग प्रस्ताव गुंडाळण्यात वित्तमंत्री यशस्वी झाले. परिणामी, संसदेला धाब्यावर बसवण्यासाठी ते अजून निर्भीड झाले.
 २० मे २००८ रोजी २००८-२००९ च्या अर्थसंकल्पातील चर्चेला उत्तर देताना जगभरातील अनेक देशांत वायदेबाजारावर उलाढाल कर (CTT) असल्याचे आणि हा उलाढाल कर जवळजवळ शेअर बाजारातील उलाढाल करासारखाच (STT) असल्याचा दावा करीत, त्यांनी भारतात वायदेबाजारावर लादलेल्या उलाढाल करावरील टीकेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
 संसदेतील, शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या दृष्टीने ही बाब तशीच वाऱ्यावर सोडून देण्यासारखी नव्हती. त्यांनी जगभरातील वायदेबाजारांशी मोठ्या परिश्रमाने संपर्क साधून, त्यांच्याकडे अशा प्रकारचा काही उलाढाल कर किंवा तशा स्वरूपाची काही वसुली केली जाते काय, याची चौकशी केली आणि त्यांच्याकडून तशी लेखी उत्तरे मिळवली. या माहितीतून निघालेला निष्कर्ष मोठा धक्कादायक आहे. उलाढाल करासारखी वसुली असणारे एकच उदाहरण अख्ख्या जगात सापडले आणि तेही छोटेखानी तैवानचे. तेथेही तायफेक्स (TAIFEX) या शेअर बाजारात विकल्या जाणाऱ्या फक्त सोन्यावर अशा तऱ्हेचा उलाढाल कर आहे आणि तोसुद्धा एक लाख रुपयांच्या उलाढालीवर फक्त १९ पैसे इतकाच आहे; भारतात मात्र चिदम्बरम एक लाख रुपयांच्या उलाढालीवर १७ रुपये कर लावण्याची बाजू लढवत आहेत.
 लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे भारतात सोन्याच्या ज्या खरेदीविक्री रोख्याचा (ETF) व्यवहार शेअर बाजारामार्फत होतो, त्यावर कोणताही उलाढाल कर नाही. आश्चर्याची गोष्ट अशी, की भारतात आता वायदेबाजारात खरेदीविक्री होणाऱ्या सोन्यावर उलाढाल कर असेल; पण शेअर बाजारात सोन्याच्या संबंधातील रोख्यांचे व्यवहार मात्र करमुक्त असतील.
 जगातील २५ मोठ्या वायदेबाजारांमध्ये मिळून, जगातील सर्व वायदेबाजारांतील उलाढातील ९९.९९% उलाढाल होते आणि तेथे कोणत्याही स्वरूपाचा उलाढाल कर (CTT) नाही. काही युरोपीय देशांमध्ये जो काही कर आकारला जातो, तो त्या बाजारांनी पुरवलेल्या सेवांसाठी वर्धितमूल्य कराच्या (VAT) धर्तीचा असतो.

 वित्तमंत्री त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या पक्षाचे जे काही वजन आहे, त्याच्या

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १५१