सेनापतीपदावरील विद्वान डॉक्टरांनी, अखेरी, २५ जून २००८ रोजी आपले सर्व पूर्वग्रह आणि प्रतिष्ठेच्या बाबी बाजूस ठेवून, गगनाला भिडू पाहणाऱ्या किमतीनी ग्रासलेल्या देशावर उपचार सुरू केले आहेत. महागाई जेव्हा ७ ते ९ टक्क्यांच्या प्राथमिक स्तरावर होती, तेव्हा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अगदी वरवरच्या लक्षणांवर भर देऊन भाजीपाला, फळे, कडधान्ये आणि खाद्यतेल यांच्या किमती उतरवण्याचे प्रयत्न केले आणि तेसुद्धा, पराभवाची खात्री असतानाही युद्ध पुकारणाऱ्या हूणांच्या अटीला राजासारखे. अर्थमंत्र्यांनी खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी करण्याचे आदेश देऊन, त्याच्या आयातीसाठी दरवाजे सताड उघडले. खाद्यतेलाच्या निर्यातदार देशांनी खाद्यतेलावर प्रचंड निर्यातशुल्क लावले, परिणामी भारतातील उत्पादन व कमी केलेले आयातशुल्क यांपासून मिळणारा फायदाच संपुष्टात आला आणि तरीही अर्थमंत्र्यांनी आयातशुल्क कमी करण्याचा आपला निर्णय बदलला नाही. बिगर-बासमती आणि काही बासमतीसदृश जातींमधील फरक ओळखणे अत्यंत कठीण आहे हे माहीत असतानासुद्धा अर्थमंत्र्यांनी बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यांनी अन्नधान्याचा साठा करण्यावर बंदी घातली आणि अन्नधान्याच्या गोदामांवर धाडी घालण्यासाठी पोलिसांना रान मोकळे करून दिले. व्यापाऱ्यांनी साठविलेला माल अधिक खोल भूमिगत झाला आणि किमती अधिकच भडकल्या. २००७ मध्ये अर्थमंत्र्यांनी चार शेतीमालांच्या वायदेबाजारावर बंदी घालून, त्यांच्या मूळ उत्पादकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे बाजारपेठेचे स्वातंत्र्य नाकारले होते; महागाईविरोधी लढाईतील या वरवरच्या उपचारात त्यांनी आणखी चार शेतीमालांच्या वायदेबाजारांवर बंदी घातली. एवढे पुरे झाले नाही म्हणून, की काय त्यांनी वायदेबाजारावर प्रचंड प्रमाणात वस्तुविनिमय कर (Commodity Transaction Tax- CTT) लागू केला. या करामुळे वायदेबाजाराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या महोदयांचा वायदे बाजाराबद्दलचा आकस प्रसिद्धच आहे. शेअर बाजाराच्या बरोबरीने वायदेबाजारही आपल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत आणण्याचा त्यांचा डाव मागे एकदा फसलेला आहे. वायदेबाजार विदेशी थेट आणि संस्थात्मक गुंतवणुकींच्या बाबतीत शेअर बाजाराशी स्पर्धा सुरू करील, या भीतीपोटी अर्थमंत्र्यांच्या मनात वायदेबाजाराला संपूर्ण मोकळीक देण्याबाबत पक्की अढी असल्याचेही सर्वज्ञात आहे.
महागाईच्या साथीने ग्रस्त झालेल्या गावात प्रवेश करण्याआधीही या विद्वान वैद्यराजांनी सर्वदूर उच्छाद मांडलेला होता. ज्या मालांच्या किमतीमध्ये काही वाढ झाल्याचे दिसत होते, त्या मालांचे उत्पादक निव्वळ हताश झाले होते.