वित्तमंत्री माननीय श्री. पी. चिदंबरम यांनी या वर्षी गोड स्वप्नवत अंदाजपत्रक देण्याचे वचन दिले होते. खरे म्हणजे गेल्या वर्षीच्या गोड स्वप्नामध्ये थोडी सुधारणा करू, असे त्यांना हे वचन देताना म्हणायचे असावे.
वचन देऊन नार्थ ब्लॉकमधील आपल्या टेबलाशी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले असावे, की दिलेले वचन पाळणे जरा कठीणच आहे. मग गोड स्वप्नील अंदाजपत्रक देता येत नाही, तर निदान भीतिदायक अंदाजपत्रक न देता, दिलेले अंदाजपत्रकच गोड स्वप्नील अंदाजपत्रक असल्याचा बाजा वाजवावा, असे ठरवून २८ फेब्रुवारी २००६ रोजी देशाच्या वित्तमंत्र्यांनी नेमके हेच केले.
शाहरूख खानचा 'मैं हूँ ना?' हा गेल्या वर्षीच्या डायलॉग सोडून, त्यांनी या वेळी 'तिरुवल्लावर आणि विवेकानंद यांचा आश्रय घेतला. विकास हाच गरिबीवर सर्वोत्तम उतारा आहे, असा इशारा त्यांनी आपल्या डाव्या मित्रांना मोठ्या खुबीने दिला.
वित्तमंत्र्यांचे अंदाजपत्रकी भाषण तब्बल नव्वद मिनिटे चालले. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील विनामूल्य अशा या दर्शनकाळातील सोळा मिनिटे राजकारणी फर्डेबाजी आणि वित्तविधेयकी आणि विधेयकबाह्य उपाययोजनांसंबंधी फटकळ शेरेबाजी यांत त्यांनी घालवली.
अप्रत्यक्ष करांमध्ये किरकोळ बदल, अप्रत्यक्ष करप्रणालीमध्ये 'जैसे थे' परिस्थिती आणि शेवटी सेवाक्षेत्रांवरील वाढीव करदायित्व यामुळे डाव्या आघाडीला संतोष वाटावा. भारतीय अर्थव्यवस्थेची चढती कमान, शेअर बाजारातील अपूर्व भरभराट आणि राष्ट्रीय सकल उत्पादनातील ८% दराची वाढ... या पूर्वी न ऐकलेल्या गोष्टींचे श्रेय कारखानदारी आणि सेवा क्षेत्रांचे आहे; ते सरकारला देता येणार नाही.