Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि परिणामी, वैफल्यामुळे आणि नाचक्कीच्या भीतीने ते आत्महत्येकडे ढकलले जात आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. सावकार आणि जमीनदार यांच्या उच्चाटनामुळे शेती क्षेत्रावर मात्र एक ठळक परिणाम झाला. या दोन्ही संस्थांच्या उच्चाटनाबरोबर, शेतीक्षेत्रात तयार झालेली बचत गावकुसाच्या आत न राहता, आता ती शहरी भागांकडे वाहू लागली. संस्थांच्या उच्चाटनामागे हाच हेतू असावा असे वाटण्यास मोठा वाव आहे. शेतकऱ्यांच्या दैनावस्थेला खरोखरच खासगी सावकार कारण आहेत का?
 गेल्या महिन्यात 'फायनान्शियल एक्स्प्रेस' या दैनिकाने 'नवीन शेतीची आव्हाने' या विषयावर एक 'गोलमेज परिषद' आयोजित केली होती. निमंत्रितांत वित्तीय संस्थांच्या आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. आश्चर्य म्हणजे या शेतीविषयक परिषदेला शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणालाही निमंत्रण नव्हते. महाराष्ट्राचे कृषी आयुक्त श्री. गोएल यांनी ही बाब आवर्जून निदर्शनास आणली. शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे या परिषदेत कोणी नसले, तरी वित्तीय संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपल्या मांडणीत 'शेतीक्षेत्रात खासगी सावकारांचे काही स्थान आहे आणि समर्थनही आहे; शेतीमधील संसाधनांचा दर्जा सुधारण्याच्या आणि शेतीतील गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने त्यांचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येईल, असे निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, या परिषदेत सहभागी झालेले आय.सी.आय.सी.आय. बँकेचे कार्यकारी संचालक श्री. नचिकेत मोर हे स्वतः यवतमाळ जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत.
 श्री. मोर आणि इतर प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांचा थोडक्यात सारांश :
 'हिंदुस्थानातील शेती स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या, यथार्थ वित्तपुरवठा संस्थांपासून वंचित आहे. ज्यांच्याकडे शेतीला वित्तपुरवठा करण्याची थोडीफार वित्तीय क्षमता होती, त्यांना १९५० च्या दशकात गावातून चंबूगबाळे आवरून पळ काढावा लागला आणि अजूनही त्यांच्यामागचा ससेमिरा चालू आहे. त्याशिवाय, शेतीला 'राम राम' करण्यासंबंधीचे सरकारी धोरण शेतीमध्ये, शेतीचा गाडा चालू राहण्याइतपतसुद्धा नवीन हुन्नर आणि भांडवल येण्याला प्रतिबंध करते.'

 ग्रामीण पतपुरवठ्याच्या पारंपरिक व्यवस्थेविरुद्ध १९५०च्या दशकातील विषारी मोहीम केवळ शेतकऱ्यांच्या भोळेभाबडेपणामुळे यशस्वी झाली. सावकारांना काढून, त्यांच्या जागी येणाऱ्या, तारणहार वाटणाऱ्या सहकारी प्राथमिक सोसायट्या आपले काहीसे भले करतील असे शेतकऱ्यांना वाटले होते. पण, सहकारी संस्था

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ११४