पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





सावकारांचे पुनरागमन


 खासगी सावकारांसंबधी वादविवाद इतिहासजमा झाला आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी एक बातमी आहे. महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील, आत्महत्या करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सत्तेच्या अगदी शिखरावर असलेले लोकही, खास करून विदर्भातीलच शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात, त्याचे कारण मांडण्यासाठी षड्यंत्र रचीत आहेत. त्याही पलीकडे, शेतकऱ्यांच्या या हवालदिलपणाचे केंद्र यवतमाळ जिल्हा का असावा, हेही शोधण्याच्या मिषाने त्यांनी षड्यंत्र रचले आहे. सहकारी बँकांनी सुरू केलेल्या कर्जवसुली मोहिमेत त्यांचे अधिकारी व कर्मचारी ज्या जाचक आणि अपमानकारक पद्धती अवलंबित आहेत; त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन, विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत, हे स्पष्ट दिसत असताना यवतमाळ जिल्ह्यासाठी मात्र वेगळेच रामायण रचले जात आहे. यवतमाळ हा पूर्वी इजारदारांचा म्हणजे शंभर-सव्वाशे एकर पदरी बाळगणाऱ्या जमीनदारांचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. साहजिकच, त्यातले काही इजारदार खेड्यातील लोकांना कर्जाऊ पैसे देत. पूर्वाश्रमीच्या या इजारदारांपैकी काही आजही कर्जाऊ पैसे देण्याचा व्यवसाय करीत असण्याची शक्यता आहे. खासगी सावकारांचे जवळजवळ उच्चाटन झाले आहे असे म्हटले जात असले, तरी आजमितीला महाराष्ट्रातील नोंदणीकृत सावकारांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे त्यातलेच काही यवतमाळ जिल्ह्यातही आपला व्यवसाय करीत असण्याची शक्यता आहे.

 महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील शेतकरीसुद्धा खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. खासगी सावकारांना आपल्या कर्जवसुलीसाठी जोरजबरदस्तीचा कोणताच मार्ग उपलब्ध नसतो. आता तर खुद्द महाराष्ट्र राज्य शासनच, 'खासगी सावकारांची

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ११२