पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
डॉ. मृणालिनी फडणवीस,
(कुलगुरू - पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर)


मनोगत

 बरीच वर्षे अर्थव्यवस्थेच्या विविध विषयांवर लिहीत असताना अनेक बाबी समोर येत गेल्या. अर्थव्यवस्थेची परिस्थिती, बजेट,जागतिकीकरण, भांडवलवाद, देशाच्या विविध समस्या या सर्वांचा विचार घेऊन विचारांचा प्रवाह चालू राहिला. त्याला लेखणी स्वरूपात उतरविण्याचे कार्य बऱ्याच वर्षांनी केले, त्यामुळे काही आधीच्या घडामोडी, काही काळापूर्वीच्या घटना, पण त्या आज देखील महत्त्वपूर्ण आहेत. जागतिक घडामोडी I.M.F (आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष) व W.B. (जागतिक अधिकोष)च्या अवतीभोवती फिरताना दिसतात. त्यामुळे जगात विकसित देशांचे वर्चस्व आधी होते आणि थोडे फार समीकरण बदलत ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वैश्विक चर्चा २०२० पर्यंत कशा वेगळ्या होत्या, याचा आढावा यात घेतला आहे.
 भारताची बदलती परिस्थिती जरी आता वेगळी असली तरी, काही पूर्वीच्या घडामोडी यात समाविष्ट आहेत. कारण पूर्वीच्या बाबींचा विचार किंवा कृषी, अर्थसंकल्प त्याचे स्वरूप समजावून घेण्यासाठी आधीची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. भारताच्या प्रगतीसाठी जसे प्रयत्न झाले तसे तळागाळातील लोक व मध्यमवर्गीयांच्या समस्या सुटायला पाहिजे होत्या. पण त्या खऱ्या अर्थाने सुटल्या नाहीत. निरपेक्ष दारिद्र्य याची वारंवार स्थिती विचारात घ्यावी लागली. संरचनात्मक बदल नुकतेच घडायला लागले आहेत, आणि त्याचा परिणाम उद्योग-व्यापार, कृषी क्षेत्र इत्यादी वर होतो आहे. त्यामुळे पूर्वीची स्थिती आणि आताच्या या परिस्थितीत भरपूर अभ्यास करता येईल, अशी उपयोगिता होऊ शकेल. लोकसंख्या, युवावर्ग व त्यांचे प्रश्न सोडवण्यात आज देखील तेवढीच कसरत करावी लागते, जितकी आधी होती, त्याचा एक आढावा ह्यात आहे.



अर्थाच्या अवती-भवती । ६