पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छाब्रिया बंधू, कलकत्त्याचे आर. पी. गोयंका, स्वराज्य पॉल, हिंदुजा बंधू ही काही प्रमुख मंडळी या व्यवहाराद्वारे भारतीय उद्योग जगतात आपले पाय पक्के रोवत आहेत. नुकत्यात झालेल्या लार्सन आणि टुब्रो या कंपनीच्या शेअरच्या भावातील झालेली अचानक वाढ हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अद्यापही नजीकच्या काळात झालेल्या प्रचंड खरेदीमागे कोणाचा हात असावा याबद्दल अनेक तर्क-वितर्क करण्यात येत आहेत. अशाप्रकारे खरेदी किंवा विक्री ही भांडवल बाजारात अनपेक्षित गोष्ट नाही. परंतु, मंदीच्या व अनिश्चिततेच्या काळात भांडवली बाजाराच्या निकोप वाढीस नक्कीच बाध्य ठरते.
 ५. भांडवल बाजारात बऱ्याच काळापासून असलेले मंदीचे अजून एक कारण म्हणजे मागील दोन ते तीन वर्षांत काही भागात सतत पडणारा दुष्काळ हे होय. या दुष्काळामुळे सर्वप्रथम खेड्यातील लोकांची क्रयशक्ती घटते व पर्यायाने औद्योगिक उत्पादनावर परिणाम होतो. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याकरिता सरकारी तिजोरीवर असह्य ताण पडतो. यावर्षी मात्र मान्सून वेळेवर असल्याने एकूण चित्र आशादायक आहे.
 ६. मागील काही वर्षांत बाजारातील मंदी ही तशी नवीन गोष्ट नाही. परंतु, या प्रदीर्घ काळातही काही वेळा बाजारात तेजी ही आलीच. वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक सरकारी वित्तीय संस्था भांडवल बाजारात कार्यरत आहेत. यु. टी. आय.ने मंदीच्या काळात काही निवडक शेअर्सची जोरदार खरेदी करून तेजी निर्माण करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु, व्यापारी बँकांनी (म्युच्युअल फंड) मात्र जॉम्बिंग ऑपरेशन करून अल्पकालीन खरेदी-विक्रीत नफा कमविला. हे त्याच काळात झाले ज्या काळात यु.टी.आय. निवडक वायद्याच्या शेअर्समध्ये खरेदी करून तेजी आणण्याचा प्रयत्न करीत होती. यावरून एकच दिसून येते की, भांडवल बाजारात कार्यरत असणाऱ्या सर्व सरकारी संस्थांमध्ये सुसूत्रता नाही व परिणामी भांडवल बाजारात योग्य वातावरण निर्माण होऊ शकत नाही.
 ७. भाग-भांडवलाने पैसा गोळा करणाऱ्या कंपनीचे शेअर्स भांडवल बाजारात यादीवर लागायला बराच वेळ लागतो व पर्यायाने या नवीन शेअर्सची तरलता कमी होते. पब्लिक इश्यू ते लिस्टिंग ऑफ शेअर्स यामधील काळ कमी होणे हे अत्यंत आवश्यक आहे. १९८५ ते १९८६ च्या काळात ज्या अनेक कंपन्यांनी भाग-भांडवलाद्वारे पैसे गोळा केले त्यापैकी सुमारे शंभर कंपन्या अशा आहेत ज्यांचे शेअर्स (समभाग) भाग-भांडवल बाजारात यादीवर आले. परंतु, दोन वर्षानंतरही या शेअर्समध्ये खरेदी-विक्रीचा काहीच व्यवहार

झालेला नाही.

अर्थाच्या अवती-भवती । ३७