पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले. ही मंडळी भांडवल बाजारापासून काही काळाकरिता दूर गेली.
 या नुकसानीचे मुख्य कारण म्हणजे या कालावधीत भांडवल बाजारात उतरलेल्या अनेक कंपन्या. त्यांना पूर्वाश्रमीचा विशेष अनुभव नसतानाही त्यांनी या तेजीचा फायदा घेऊन भांडवल बाजारातून पैसा गोळा केला. याच काळात अनिवासी भारतीयांकडून (एन.आर.आय) भारतातील गुंतवणूक वाढीला लागावी म्हणून सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू झाले. सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशस्त भारतीयांसोबत बैठका झाल्या आणि भरघोस आश्वासने देण्यात आली. भारतीय भांडवल बाजारात व्याजाचे दर आकर्षक असल्यामुळे परदेशस्त भारतीयांचा बचतीचा भारताकडे सुरू झाला. परंतु, लालफीतशाही आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक अप्रसिद्ध कंपन्यात गुंतवणूक केल्यामुळे अनिवासी भारतीयांना आर्थिक फटका बसला व त्यांच्या भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण कमी व्हायला लागले. याचे आणखी एक कारण म्हणजे विकसित देशांमधील भांडवल बाजारात आलेली जबरदस्त मंदी. डॉ. रवी बत्रा यांनी भाकीत केलेल्या १९९० सालच्या आधीच आलेल्या या मंदीमुळे अनिवासी भारतीयांचा भांडवल बाजारात गुंतवणूक या प्रकारात विश्वास कमी झाला. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने या तेजीच्या काळात भारतीय तसेच अनिवासी भारतीय यांच्यासाठी मास्टर शेअर्स आणि म्युच्युअल फंड या उपक्रमांची घोषणा केली आणि त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या काळात आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे सार्वजनिक उपक्रमांनी विक्रीस काढलेले कर्जरोखे. एन.टी.पी.सी., आर.ए.सी., आय.टी.आय., एच.एच.पी.सी.या कंपन्यांनी भांडवल बाजारात पदार्पण केले. आणि भांडवल बाजारातून आपल्या विस्ताराच्या योजनांकरिता ४०० कोटी रुपये जमा केले. याचा अनिष्ट परिणाम काही प्रमाणात भांडवलांवर आणि बऱ्याच जास्त प्रमाणात पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या कर्जरोख्यांवर झाला. अर्थव्यवस्थेतून काळा पैसा उत्पादक उपक्रमांकरिता मिळावा म्हणून सरकारने नऊ टक्के करमुक्त कर्ज रोखेही जाहीर केले व बाजारातून पैसा गोळा केला. १९८५ च्या तेजीत खरेदी केलेल्या छोट्या गुंतवणूकदारांना नंतर जो जबरदस्त आर्थिक फटका बसला त्यामुळे यातील बरेचसे गुंतवणूकदार सरकारी कर्जरोख्यांच्या माध्यमाकडे वळले आणि धनिक वर्ग करमुक्त कर्जरोख्यांच्या माध्यमातून काळा पैसा गुंतवू लागला. परिणामी भांडवल बाजारात मंदी आली. यापुढची महत्त्वाची घटना म्हणजे सार्वजनिक बँकांचे भांडवल बाजारात पदार्पण होय. छोट्या गुंतवणूकदारांजवळ पुरेसा पैसा आणि भांडवल बाजाराचे ज्ञान या दोन्ही गोष्टींचा अभाव असतो. या गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी

आणि त्यांच्या वतीने भांडवल बाजारात गुंतवणूक करण्याकरिता कॅनरा बँक,

अर्थाच्या अवती-भवती । ३५