पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारताकरिता अंमलात आणणे शक्य नाही. तरी निरंकुश धोरणात बदल करून भारतीय अर्थव्यवस्थेला शोभेल असे धोरण तयार केल्यास आंतरिक व्यापार व उद्योगाचा विकास होऊ शकेल. श्रम व भांडवल पूर्णपणे गतिशील नाही. म्हणून या घटकांचा पूर्णपणे विचार करून धोरण तयार करणे आवश्यक आहे. जसे हस्तकला उद्योगातील लोकांना मशिनीकरणाकडे नेणे कठीण असते. तत्कालीन सोव्हिएट संघाच्या आर्थिक रचनेची ब्रिज नारायण सहमत नव्हते.
 वरील विचारधारकांचे मत बघितल्यास लक्षात येते की, तत्कालीन सरकारने लागू केलेल्या निरंकुश धोरणाविरुद्ध अनेकांनी मते मांडली होती. भारताकरीता असे धोरण उपयुक्त नाही. असे ९० टक्के लोकांचे मत होते. हे धोरण जर एका अर्थव्यवस्थेला स्वीकारावयाचे असेल तर त्यात काही बंधने असावीत, असे स्पष्ट मत मांडले गेले होते. शिक्षण, संचारव्यवस्था, सिंचन, विमा या सारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांकरिता सरकारी नियंत्रण आवश्यक आहे. सरकारला एक राष्ट्रीय विभाग (National Agent) म्हणून मान्य केले पाहिजे. त्यांचे कार्य सर्व प्रकारच्या राष्ट्रीय दर्जा पूर्ण करणे, असे असले पाहिजे. सरकारी कार्याच्या तुलनेत वैयक्तिक किंवा सहकारी कार्य तितके प्रभावी राहणार नाही.
 त्या काळातील मुक्त व्यापाराची संकल्पना इंग्रजांच्या फायद्याकरिता योजलेली होती. म्हणून सर्व भारतीय अर्थतज्ज्ञ या पद्धतीच्या विरोधात होते. त्या काळात उद्योगाला संरक्षण नव्हते म्हणून कोणतेच सहाय्य दिले जात नव्हते. हमी व आर्थिक मदत मिळत नव्हती. अशामुळे भारतीय उद्योगाला मोठ्या प्रमाणात धोका होणे हे निश्चित होते. तसेच शेती क्षेत्राच्या विकासाकरिता कोणतेही लाभकारी पाऊल उचलले गेले नव्हते. त्या काळातील करव्यवस्था साधारण उद्योजकांत व व्यक्तींना फार कष्टदायक होती. त्यामुळे निरंकुश धोरण पूर्णपणे संपावे, अशी मागणी व चर्चा होत होती. राष्ट्रीय हिताला धोका होऊ नये हा प्रश्न सर्वात मोठा होता.
 सर्व प्रकारच्या उद्योगांना, व्यापाराला व इतर व्यावसायिकांना सरकारच्या मदतीने विकासाच्या मार्गाला लावावे आणि विदेशी गुंतवणूक मर्यादित असावी. ही गुंतवणूक करताना आपल्या देशाचे हित धोक्यात जाऊ नये याची काळजी घ्यावी. अतिरिक्त कर कमी करून लोकांचे राहणीमान वाढू शकेल असा प्रयत्न असावा, अशी विचारसरणी दादाभाई नौरोजी यांच्या काळापासून ते ब्रिज नारायण यांच्या लिखानापर्यंत बरीच चर्चिली गेली. नंतर इतर नेत्यांनी व

विचारवंतांनी हे विचार आणखीन पुढे नेले व योग्य दिशा दिली.

अर्थाच्या अवती-भवती । १९