पान:अमेरिका पथदर्शक.pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४४
अमेरिका-पथ-दर्शक

तात. गोऱ्या मजूरांची अशी समजूत असते की, हिंदी मजूर फार थोड्या मजुरीवर काम करतात; व ह्यामुळे त्यांचें नुकसान होतें. ह्याच कारणाकरितां गोरे मजूर व हिंदी मजूर ह्यांमध्यें तंटे होत असतात. ज्यांना शांतपणें राहून आपला निर्वाह करावयाचा आहे त्यांनी अमेरिकन लोकांप्रमाणेच चालचणूक ठेविली पाहिजे. त्यांनी लागेल तर मांस खाऊं नये परंतु राहणें सवरणें व पोषाख अमेरिकन लोकांप्रमाणें करावयास पाहिजे. असें केलें तरच आपल्याकडे पाहून कोणी बोटें मोडणार नाहींत. पटके बांधण्याचें सुरूं ठेविल्यास मात्र मुलें आपल्याला पाहून टाळ्या वाजवितील व आपली चेष्टा करतील.
 प्र० ४५--अमरिकन लोकांचा धर्म कोणता?सर्व लोक ख्रिश्र्चन तर नाहीत ना?
 उ०--सर्वच अमेरिकन ख्रिश्र्चन नाहींत. स्वतंत्र विचार करणारे तेथें बरेच लोक आहेत.ते 'ईसा'ला फार चांगलें समजतात. इतर धर्माच्याहि ग्रंथाचें ते अध्ययन करतात. कांही लोक निःपक्षपाती आहेत. त्यांना सर्व धर्मांतील चांगला चांगला भाग ग्राह्य वाटतो, तर उलट कांहीं फार जहाल असून आपल्या धर्माचे कट्टे पुरस्कर्ते आहेत. हे लोक स्वार्थी असून ह्यांची वागणूक तीन शतकांपूर्वीच्या धर्मवेड्या यूरोपियनांप्रमाणे असते. कांहीं खऱ्या भावननें ईसाला परमेश्वर समजतात; परंतु अश्या श्रद्धावान लोकांची दिवसेंदिवस संख्या कमी कमी होत जात आहे. बऱ्याच लोकांनी बायबलांतील शब्दांच्या अर्थविवरणाकरितां हल्लींच्या परिस्थितीचा विचार करून विस्तृत टीपा लिहिल्या आहेत. अशा प्रकारें आपला जहाल धर्मभोळेपणा टाकून देऊन विश्वव्यापक धर्माशी संबंध असलेल्या शेलक्या तत्त्वांचाच त्यांनी अंगिकार केला आहे. ते आपल्याला निरनिराळ्या धार्मिक ग्रंथांचे अभिमान बाळगणारे समजतात. कोणी ख्रिश्र्चन साइंटिस्ट, कोणी न्युथॉट, कोणी स्पिरीच्युआलिस्ट, कोणी ख्रिश्र्चन सोशियालिस्ट इत्यादि नांवाने संबोधले जातात. देशांतील सद्य:कालीन गरजा ज्या मार्गाने भागवितां येतील, त्या बाबींकडे सर्वांचे सारखेंच लक्ष लागलेले असते. अर्थात् सर्व धर्मांतील ग्रंथ वाचून आपल्या परिस्थितीला योग्य तो उपदेश त्यांमधून ते ग्रहण करितात.
 अमेरिका हा एक प्रमुख साक्षर देश आहे. साक्षर देशाचा धर्महि त्या देशांतील शिक्षणपद्धतीवर अवलंबून असणार. ह्यामुळेच विकास-सिद्धांताला (Evolution Theory) धरून त्यांचा धर्म असून, परिस्थितीनुसार त्यामध्यें रुपांतर घडत जातें. ज्या वेळी ज्या धार्मिक बंधनांची गरज वाटत