पान:अमेरिका पथदर्शक.pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८
अमेरिका-पथ-दर्शक

गेल्यावर फिरून बाहेर येणार नाहीं! मोठमोठ्या शहरांत निरामिष उपहारगृहेंही असतात. परंतु नव्या इसमास अशा गृहांचा शोध लावणें फार कठीण जातें. तेथें कोणा एखाद्यास विचारलें तरी पत्ता लागत नाहीं.कारण, बहुतेक सर्व मांस खातात, अर्थात त्यांना निरामिष हॉटेलांची माहिती नसते. एखाद्या 'ड्रॅगस्टोअर' मध्यें जाऊन शहराची Directory पहावी. त्यांत Vegetarian cafe ह्या सदराखालीं आपणाला अवश्य ती माहिती मिळण्याचा संभव आहे.

 प्रश्न १९--मिडलस्कूल पास झालेला विद्यार्थी अमेरिकेंत गेल्यास त्याचा फायदा होईल काय ?

 उ०-- कां बरें होणार नाहीं ? कांहींहि न शिकतां अमेरिकेस गेलेल्या माणसासहि बराच फायदा मिळवतां येईल. तेथे तर ख-या हिंमतीची जरूरी आहे. शिकण्याकरितां सर्व दरवाजे खुले आहेत. मिडल स्कूल पास विद्यार्थी अमेरिकेंत हायस्कुलांत भरती होऊन मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर विश्वाविद्यालयांत भरती होऊं शकतो.

 प्रश्न २०--अमेरिकेच्या किना-यावर उतरतांना कोणाची परवानगी घ्यावी लागतें काय ?

 उ०--मी पूर्वीच सांगितलें आहे कीं, अमेरिकन बंदरावर उतरल्यावर अमेरिकन सरकारचे अधिकारी येऊन अनेक प्रश्न विचारतात. हीच परवानगी समजा. कांहीं आजार नसेल व दाखविण्यास पुरेसें पैसे असतील तर त्यांच्याकडून उतरण्याची परवानगी मिळण्यास कांहींच अडचण पडत नाहीं.

 प्रश्न २१--अमेरिकेच्या कोणत्या भागांत काम मिळविणें सोपें जातें ?

 उ०--अमेरिकेच्या पश्चिम भागांत अल्पसायासानें काम मिळूं शकतें. कॅलिफोर्निया, ऑरेगॉन, वाशिंग्टन, ओहियो, मोन्टाना इत्यादि संस्थानांमध्ये काम बरेच असतें. उन्हाळ्यांत तर ह्या संस्थानांत माणसांना पकडून, काम करण्यास घेऊन जातात व त्यांची खुशामत करतात. ह्या दिवसांत साडेसात रुपयेपर्यंत देखील रोजची मजुरी मिळते.

 प्र०२२--अमेरिकेंतील राहणें-सवरणें व घरभाडें ह्यासंबंधीची अवश्य ती माहिती सांगण्याची कृपा करावी.