पान:अमेरिका पथदर्शक.pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४
अमेरिका-पथ-दर्शक

 प्रश्न ११ वाः-अमेरिकेच्या किना-यावर उतरल्यावर डॉक्टरची परीक्षा होत असते काय?

 उ:-कोणीही हिंदी इसम जेव्हां हिंदुस्थानच्या एखाद्या बंदरावरून अमेरिकेकडे जातो, तेव्हां त्याची प्रथम हिंदुस्थानांत डॉक्टर तपासणी करतो. अमेरिकेस पोहोंचल्यावर जेव्हा तो एखाद्या बंदरावर उतरतो, तेव्हां दुस-यांदां डॉक्टर-तपासणी होते. भेद इतकाच कीं, हिंदुस्थानांतील बंदरावर डॉक्टर बाहेरील स्वच्छतेकडे लक्ष देतो, कपडे मळके असल्यास कपड्यास वाफारा देण्यास फर्मावितो;व जे डेकचे प्रवासी असतात,त्या सर्वांच्या कपड्यांस वाफारा देण्यांत येतो. वरच्या दर्जाच्या उतारूं बरोबर मात्र असें वर्तन करण्यांत येत नाहीं. त्यांची केवळ नाडीच पाहण्यांत येते. अमेरिकन बंदरावर जी डाक्टर-तपासणी होते, ती विशेषतः डोळ्यांची तपासणी होते. 'मायोपिया' दृष्टीच्या लोकांना प्रतिबंध करण्यांत येत नाही. परंतु खुप-याचा (Trachoma ) आजार असल्यास प्रवाश्याला परत जावयास सांगण्यांत येतें. दुसरा कोणताहि असा सांसर्सिक रोग असला तरी असेंच करण्यांत येतें.

 प्र. १२-स्वावलंबी होऊन शिक्षण मिळवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी अमेरिकेस गेल्यावर काय करावें?

 उ:-अमेरिकेंत स्वावलंबी बनून शिक्षण मिळवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनीं प्रथम मजुरी करण्यास शिकलें पाहिजे. वर्णाश्रमधर्माच्या खोट्या अभिमानाचा त्याग केला पाहिजे व सर्व प्रकारच्या मजुरीचें काम करण्याची करण्याची संवय केली पाहिजे. येथून कमींत कमी आठशे रुपये अवश्य घेऊन जावें, म्हणजे भाडें व तेथें दाखविण्यास पुरेसे पैसे जवळ राहतील. अमेरिकेस गेल्यावर तेथील वर्तमानपत्रे नेहमी वाचीत असावें, कारण वर्तमानपत्रांच्या मागच्या पानावर Help Wanted अशा मथळ्याखाली जाहिराती असतात. त्यामध्यें आपल्यालायक जें काम असेल, त्यासंबंधी चवकशी करावी. युनिव्हर्सिटीत दाखल झाल्यावर युनिव्हर्सिटीच्या Employment bureau मध्ये जाऊन कामाची मागणी करावी. ह्याप्रमाणे प्रयत्न करूनहि काम न मिळाल्यास घरोघरी हिंडून कामाची चवकशी करावी. ह्याप्रमाणे सतत प्रयत्न केल्यास त्यास काम अवश्य मिळेल.