पान:अमेरिका पथदर्शक.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८
अमेरिका-पथ-दर्शक

येतें मुंबईला American Lloyd ह्या कंपनीच्या जहाजांतून पोर्ट सय्यदला गेल्यावर तेथें दुस-या एखाद्या कंपनीच्या जहाजावरून अमेरिकेत जातां येईल. जोवर शक्य होईल तोंवर इंग्रजी कंपनीची तिकिटें खरेदी करू नयेत. हालंड, जर्मनी, आस्ट्रिया, अमेरिका ह्या देशांतील कंपन्यांची जहाजें बरीच असतात व ह्या जहाजांवर बऱ्याच सोई असून अपमान होण्याची भीति नसते.मी जर्मन कंपनीच्या जहाजांतून आजवर प्रवास केला असून पुढेंहि त्याच कंपनीच्या जहाजांतून प्रवास करण्याचा माझा विचार आहे.
 ह्या मार्गानें कोलंबो किंवा मुंबईहून गेल्यास एडन, सुएझ, पोर्ट सैय्यद, नेपल्स, जिनोआ, मार्सेलिस इत्यादि बंदरें लागतात. मार्सेलिस हें फ्रेंच बंदर आहे. त्या पुढील बंदरांचीं नांवें देणें कठीण आहे. कारण निरनिराळ्या कंपन्यांचीं जहाजें निरनिराळ्या मार्गानें जातात, व आपआपल्या सोईप्रमाणें निरनिराळ्या बदरावर थांबतात. इंग्लंडच्या एखाद्या बंदरावरून सुटणारें जहाज मात्र सरळ अमेरिकेंत जाऊन न्युयॉर्क, बोस्टन, फिलोडल्फिया इत्यादि अमेरिकेतील बंदरांवरच थांबते, वाटेत दुसऱ्या कोणत्याही बंदरावर थांबत नाही.
 प्रश्न ३ रा:-येथून जातांना कोणाची परवानवी घ्यावी लागते काय व घ्यावी लागत असल्यास कोणाची परवानगी काढावी लागते ?
 उत्तर:-मी जातांना कोणाचीच परवानगी काढली नाही. परंतु मी असें ऐकतों कीं, आजकाल मॅजिस्ट्रेटची परवानगी काढ़ावी लागते, असें असलें तरी त्यांत भीति कसली? कोणीहि विचारी सद्गृहस्थ समुद्रप्रवासाला कसा बरें विरोध करील ? दुसरें असें कीं, परवानगी घेऊन ठेविल्याने आणखी एक फायदा होतो. परदेशांत आपली ओळख पटविण्यास यामुळें सोपें जातें. एखाद्या अधिकाऱ्याची व सभ्य गृहस्थाची शिफारस असल्याशिवाय पोस्टांतून पत्रेहि मिळत नाहीत. म्हणून विद्यार्जनेच्छु विद्यार्थ्यानें असें शिफारस पत्र घेतल्यापासून कांहींच नुकसान नाहीं. सर्टिफिकेट शिवायही कांहीं विद्यार्थी जातात, अर्थात त्यांचे दिवस पत्रांशिवाय काळजी न करतां जातात. मजजवळ कोणाही गृहस्थाचे शिफारस पत्र नव्हतें. अशा स्थितींतच मी सर्व जग फिरून आलों.
 प्र० ४ था- कोणत्या दिवसांत येथून प्रवासास निघणें योग्य होईल?
 उत्तर-जे लोक अमेरिकेस केवळ चैनीखातर जातात व ज्यांचेजवळ खर्चाकरितां पुरसें पैसे आहेत त्यानीं अमेरिकेस हव्या त्या दिवसांत जावे. त्यांना