पान:अमेरिका पथदर्शक.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३
मी अमेरिकेस कसा पोहोंचलों

झाला नाहीं. इकडे तिकडे नोकरी करून हे दिवस मी कसे तरी काढले. जे मजजवळ थोडे पैसे होते तेही सर्व खर्च झाले, व मी अगदीच कफल्लक बनलों. परंतु 'केलेल्या कर्माचें फळ मिळतेंच मिळतें' ह्या उक्तीचा अनुभव मलाहि आला. माझे वर्तमानपत्रांतील लेख वाचून एका अमेरिकन गृहस्थास मला आपले जवळ कांही दिवस ठेऊन घेण्याची इच्छा झाली. त्यानें मला पत्र पाठवून आपलेजवळ येऊन राहण्याची विनंति केली. त्यापूर्वीच मी कामाच्या चवकशीकरितां उलंगापोला गेलों होतों; व एका ठेकेदाराच्या हाताखालीं मजुरी करून आपला कसाबसा निर्वाह करत होतों. अमेरिकन गृहस्थाचें पत्र पोहोंचतांच मी मनीलास परत गेलों, व त्या अमेरिकन गृहस्थाची-मिस्टर स्कॉटची-भेट घेतली. माझे श्रमाचें चीज होऊन त्यानें मला संस्कृत शिकविण्याकरितां आपल्या घरीं ठेविलें. त्यांनी ह्याचा मोबदला म्हणून मनीलापासून शिकागोपावेतो टिकीट काढून देण्याचें कबूल केलें. तीन महिने मी त्या गृहस्थाजवळ राहिलों व त्याला व्याकरण व दोनतीन उपनिषदें शिकविलीं. हे दिवस माझे फार सुखांत गेले. कारण रोज स्वाध्याय घडून शास्त्रांवर विचार करण्यास अवसर मिळाला व त्यायोगेंकरून मनांस शांतिहि मिळाली.
 तीन महिने लोटल्यावर मिस्टर स्कॉटनीं मला तिकिट काहून दिलें, व मी हांगकांगला रवाना झालों. आतां मी मनीलाहून अमेरिकेला जात असल्यामुळे मला फिलीपाईन लोकांचे आधिकार प्राप्त झाले ! अर्थात् मला डॉक्टरांच्या तपासणीचा फारसा त्रास झाला नाही. ज्या जहाजावरून मी व्हँकोव्हरला जात होतो त्यावरून बरेच पंजाबी इसमहि जात होते.
 हें जहाज कॅनेडियन पॅसिफिक कंपनीचें होतें. ह्या जहाजावरून पुष्कळसे प्रवासी अमेरिकेस चालले होतें. ज्या दिवशीं आम्ही आपलें सामान घेऊन जहाजावर बसण्याकरितां हांगकांग 'व्हार्फ'वर गेलों, त्या दिवशीं तेथे पुष्कळ जहाजें उभीं होतीं. हांगकांग हें एक मोठें बंदर असून इंग्रजांनीं एक शिबंदी तेथें ठेविली आहे. जगांतील बहुतक सर्व देशांतील लोक येथें दिसून येतात. हें शहर पाहण्यालायक आहे. येथें विजेच्या गाडया चालतात. एका अत्यंत उंच व सरळ कडयाच्या डोंगरावर जाण्याकरितां एका विजेच्या गाडीची योजना करण्यांत आली आहें. ही गाडी जवळ जवळ लंब मार्गानें सरळ टेंकडीवर जाते.