पान:अमेरिका पथदर्शक.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११
मी अमेरिकेस कसा पोहोंचलों

तुफानें उठतात. परंतु ईश्वरकृपेनें विशेष हेलकावे न खातां आमचे जहाज हांगकांगला सुखरूप पोहोंचलें; व आम्हांस विशेष त्रास झाला नाहीं.
 वाचकहो, चला आतां आपण हांगकांगची खाडी पहावयास जाऊं. येथील देखावा खरोखरच पहाण्यालायक आहे. एका पहाडावर हांगकांग शहर बसविलेलें आहे अर्धचंद्राकार खाडीमुळे तर ह्या शहराला फारच शोभा आली आहे. मोठमोठी जहाजे, लहान लहान नांवा, व चीनी डोंगे खाडीत इकडून तिकडे जात असतां, देखावा फारच सुंदर दिसतो. शहरांतून खाडींच्या दुस-या किनाऱ्यावर जाण्याकरितां लहान लहान बोटी नेहमीं सज्ज असतात. ह्या बोटींवरून मजूर व नोकर लोक जात येत असतात.
 आमचे जहाज खाडीच्या मध्यभागीं आल्यावर मी सभोंवार पाहूं लागलों, तेव्हां हांगकांगमधील अर्धचंद्राकार रांगेतील सुंदर सुंदर इमारती पाहून मला बनारसचें स्मरण झालें, व परमपवित्र भागीरथी नदीला मनांतल्या मनांत अनेक नमस्कार करून आम्हीं बंदरावर उतरण्याच्या तयारीनें बसलों. नांवावाले जहाजावर आले.तेव्हां एका नांववाल्याशीं ठराव करून आम्हीं सरळ शहरांत गेलों.येथें नाणें दुस-याच प्रकारचें असतें.सिंगापूरचें किंवा मलाई 'डालर' येथें चालत नाहींत. दुसरे नाणें जवळ असल्यास नांववाले फार त्रास देतात.नांवेंतून उतरल्यावर आपले सामान एका गाडींत घालून शीख गुरुद्वारांकडे आम्हीं चाललों. ही गुरुद्वारांचीं ठिकाणें गरीब प्रवाशांकरितां फारच सुखकारक असतात. एरव्हीं बेमाहितगार मनुष्य कोणाच्याहि झापडींत सांपडून फसण्याचा व लुटला जाण्याचा बराच संभव असतो. गुरुद्वारांत पोहोंचल्यावर, आम्हीं आपलें सामानसुमान तेथें ठेऊन, प्रथम तेथील ग्रंथीची भेट घेतली. ग्रंथीनीं आम्हांस चांगल्या रीतीनें वागवलें. कलकत्त्याहून मजबरोबर निघालेला मित्र तेथेंच आहे, हें हांगकांगला पोहोंचल्यावर मला कळलें. ईश्वरी अवकृपेंमुळे संकटांत सांपडल्यामुळे त्याला पुढे अमेरिकेस जातां आलें नाहीं. चार पांच दिवस आम्हीं गुरुद्वारांतच राहिलों. हा वेळ पावेतों अमेरिकेस जाणारे कित्येक हिंदी विद्यार्थी हांगकांगला येऊन थांबले होतें, आतां तर अमेरिकेस जाणाऱ्या हिंदी विद्यार्थ्यांची एक टोळीच बनली. माझे मित्र पालासिंह व रवि व इतर हिंदी विद्यार्थी अमेरिकेस जावयास तयार झालें. त्यांनीं आपआपली टिकटें काढून सर्व तयारीहि केली. मी बापडा फिरून एकटांच मागें