पान:अमेरिका पथदर्शक.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अमेरिका-पथ-दर्शक

खास सोडणार नाही.”असो.अशा प्रकारें मी आपल्याच विचारांत चूर होऊन गेलों. एका पंजाबी मित्रानें मला मदत करण्याच वचन दिलें होतें, म्हणून त्याचेबरोबर मी 'ईंपू'ला गेलों. तेथेहि आपले लोक बरेचे आहेत. बहुतेक सर्व शीख आहेत. त्यांपैकी बरेंच फौजेंतील शिपाई असून कांहीं वॉचमनचे काम करणारे आहेत. ह्याशिवाय कांहीं हिंदी इसम काबाडकष्ट व मजुरी करून पैसे मिळवितात. हे बंदर इंग्रजांचे ताब्यांत आहे. येथील मूळ रहिवाशांस 'मलाई' असें म्हणतात. ते बहुतांशीं मुसलमान असून आपल्या धर्माचे कट्टे अभिमानी आहेत. परंतु हे लोक पंजाबच्या लोकांप्रमाणें उद्योगी नाहींत. ह्याच कारणामुळे त्यांचा राज्यकारभार करण्याचें काम पर प्रांतीय लोक बळकावून बसले आहेत. ह्या बेटांत चीनी लोकहि पुष्कळ आहेत. शिवाय दक्षिण हिंदुस्थानांतील कलिंग लोकहि आहेत. कलिंग हा शब्द killing ह्या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश आहे. खूनाच्या अपराधाकरितां ज्या हिंदी गुन्हेगारांना हद्दपारीची शिक्षा होत असे, त्यांना येथें पाठविण्यांत येत असे. ह्याविषयीं एक दंतकथा सांगण्यांत येते. कोणा एका मलाई माणसानें गो-या माणसाजवळ हिंदी गुन्हेगारासंबंधी विचारपूस केली, तेव्हां त्यांनीं सांगितलें, ' they killing men ” ह्यांवरूनच ह्या लेोकांना 'कलिंग' असें म्हणण्यांत येऊं लागलें. हे लोक पीनांगमध्यें अधिक प्रमाणांत असून तेथें त्यांचे एक धर्म मंदिरही आहे. ह्या मंदिरांत ते आपली पूजाअर्चा करत असतात.
 मी आपल्या मित्राबरोबर तेथें(ईपूला)गेलों खरा. परंतु मला कांहीं विशेष लाभ झाला नाहीं. इकडे तिकडे फिरावयास मिळाल्यामुळे भारतीय बांधवांची स्थिति अवलोकन करण्याची संधि मात्र चांगली मिळाली. त्यापैकीं बरेचसें फौजेंतून नौकर होते. कांहीं लोक गाई विकत घेऊन दुधाचा व्यापार करतात व कांहीं दुकानें चालवितात. सांगावयाचें इतकेच की,भारतीय लोक परिश्रम करून येथें राहिले असून श्रमाचे फळहि त्यांस येथे उपभोगावयास सांपडते. येथील हवा-पाणीहि उत्तम आहे.आगगाडीतून प्रवास करीत असतांना जंगल व पहाडांचे नयन मनोहर दृश्य आम्हांस पहावयास सांपडले. हे देखावे पाहून आमची मनें सुप्रसन्न झालीं. ईंपूहून जेव्हा मी आपल्या मित्राच्या गावीं परत आलों तेव्हां माझी एका शीख विद्यार्थ्याशी भेट झाली. तो देखील अमेरिकेस जाणार होता.