पान:अमेरिका पथदर्शक.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मी अमेरिकेस कसा पोहोंचलों

टिकटें (तिसरा वर्ग) घेतलीं होतीं त्यांस दुस-या वर्गातील एक चांगली खोली दिली. असो. आम्हांस ह्यावर कांहींच करतां येण्यासारखें नव्हतें.

 आतां प्रवासाचें वृत्त ऐका. पहिल्या दिवसाची रात्र अत्यंत हालअपेष्टांत गेली. सर्व रात्र बसून काढावी लागली. ह्या दिवसांत फार उकडत असे.हुगळीमध्यें दोन दिवस अधिक काढावयाचे होते. जेव्हां जहाज हुगळीच्या समुद्रांतून बाहेर पडून बंगालच्या उपसागरांत शिरलें, तेव्हां समुद्रानें आपलें उग्र स्वरूप दाखविण्यास सुरवात केली. कारण, हे दिवस वर्षा कालांतील समुद्राचे यौवनावस्थचे दिवस होते. अर्थात् जहाज डोलायला लागले. मोठमोठया लाटा समुद्रांत उत्पन्न होऊन प्रवाशांशीं हस्तांदोलन करण्याकरितांच कीं काय, त्यांच्या जवळ जात होत्या. केवळ हस्तस्पर्शावरच संतुष्ट न राहतां त्या लाटा प्रेमानें प्रवाशांना समुद्रस्नानहि करावयास लावीत होत्या. आम्हीं दुस-या मजल्यावर असल्यामुळे आम्हांस विशेष त्रास झाला नाहीं. परंतु शीखांवर ही एक आपत्तीच येऊन पडली. त्यांचें सर्व कपडे भिजून गेले. त्यांच्या जवळचे पीठही पाण्यानें खराब झालें. दिवसा चैन नाहीं, रात्री झोंप नाहीं, अशा हलाख स्थितींत ते बिचारे पडले हाते. माझ्या मित्रानेंही कांहींच खाल्ले नाहीं. ते ह्या दिवसांत स्वस्थ पडून होता. मी आपल्याबरोबर मीठाचे व लिंबाचे कांहीं रुचकर पदार्थ घेतले होतें. ह्या पदार्थाचा मला फारच उपयोग झाला. कारण, जेव्हां समुद्र क्षुब्ध होतो व जीव मळमळायला लागतो, तेव्हां मीठाचे पदार्थ खाल्यानें किंवा लिंबाचे लोणचें चाखल्यानें मळमळ दूर होतें; यामुळें माझी प्रकृती चांगली राहिली व मी आपल्या मित्राची शुश्रूषा करीत होतो. चारपांच दिवसानंतर समुद्रानें शांत स्वरूप धारण केलें व आम्ही पीनांगच्या खाडीजवळ पोहोंचलों. आतां, जहाजावरील प्रवासाच्या सुखाचा अनुभव येऊं लागला. समुद्रावर हीं छोटीशीं आगबोट इतक्या संथपणें चालत होती कीं, जणु काय पाण्यावर बदक तरंगत आहे. संध्याकाळीं जेव्हां भगवान् सूर्य नारायण अस्तास जाई तेव्हां तर क्षितिजावरील दृश्य अधिकच मनोहर दिसत असे. सोनेरी किरणें पाण्याबर पडल्यावर त्यांचें निरनिराळ्या रंगात पृथक्करण झालेलें दिसून येई. हे दिवस आमचे इतके आनंदांत गेले की, आम्हीं मागील चार दिवसांचे सर्व दुःख विसरून गेलों. आम्ही सर्व दिवस डेकवर बसण्यांत, पुस्तकें वाचण्यांत व पत्ते खेळ