पान:अमेरिका पथदर्शक.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अमेरिका-पथ-दर्शक
मी अमेरिकेस कसा पोहोंचलों.

 १९०४ सालचें शेवटीं शेवटी अमेरिकेस जाण्याची मला इच्छा झाली. ह्यापूर्वी कित्येक वर्षे अगोदरपासून नवीन खंड पाहण्यास जाण्याचें विचार माझे मनांत घोळत होते. परंतु हा वेळपर्यंत त्यासंबंधीं निश्चय असा मी कांहींच केला नव्हता परंतु जेव्हां अमेरिकेस गेलेल्या हिंदी प्रवाश्यांची वर्तमान पत्रांतील पत्रे व उत्तेजनपर लेख माझ्या वाचण्यांत आले तेव्हां अमेरिकेस जाण्याचा मी निश्चय केला, व त्यानंतर माझें सर्व लक्ष अमेरिकेस जाण्याकडेसच लागून राहलें.
 नोव्होंबरमध्यें लाहोरमध्यें उत्सवांची एकच गर्दी असते. काशीच्या कित्येक मित्रांबरोबर मीहि लाहोरास जावयाचें ठरविलें. असें करण्यांत माझा दुसराहि एक उद्देश होता. पंजाब प्रांत ही माझी जन्मभूमी असून तेथेंच माझे वडील व व आप्तबांधव राहत असत. ह्यानिमित्तानें तरी त्यांची भेट होईल असा विचार करून मी लाहोरास गेलों,व तेथे भाऊबहिणीबरोंबर अमेरिकेस जाण्यासंबंधीं चर्चा करण्यास प्रारंभ केला. तेव्हां सर्व मंडळी माझी थट्टा करायला लागून मला कल्पनावादी' शेख महंमद ' ह्या नांवानें संबोधू लागली. ते म्हणाले, ' तूं द्रव्याशिवाय अमेरिकेस जाणार तरी कसा ? ' व खरोखरींच मजजवळ तर पंधरा रुपयांपेक्षां अधिक कांहींहि नव्हतें.
 जेव्हां माझ्या वडिलांना माझे विचार समजले, तेव्हां तर आधिकच मौज उडाली. वडीलांनीं माझी समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला ते म्हणाले, " देव, तू भलताच अविचार करूं नकोस; विनाकारण तुला हालअपेष्टा व संकटें सोसावीं लागतील." परंतु माझ्या डोक्यांत अमेरिकेस जाण्याचें भूत संचरलें