पान:अमेरिका पथदर्शक.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८ )

परिचयावरून आम्हीं गुरुवर्य दा० वि० गोखले, संपादक ‘मराठा" यांस ह्या पुस्तकास प्रस्तानना लिहण्यास विनंति केली. आमची विनंति मान्य करून सुंदर प्रस्तावना लिहून दिली व स्वामी सत्यदेवांकडून परवानगी मिळचून देण्याचें कामीं त्यांनीं जी अमोल मदत केली याबद्दल त्यांचेहि आम्हीं फार ऋणी आहोत. इतकेंही झाल्यावर पुस्तक प्रसिद्ध करणें आर्थिक अडचणीमुळे अशक्यच होते,परंतु ही अडचणहि आमचे परमपूज्य ज्येष्ठ बंधु बाळासाहेब उर्फ जयदेव नारायण हुद्दार यांनी वेळेवर आर्थिक साहाय्य करून दूर केली व यामुळेंच हें पुस्तक वाचकांस सादर करतां येत आहे. अर्थात् पुस्तक प्रसिद्ध झाल्याचे बहुतेक श्रेय आमच्या ज्येष्ठ बंधूंच्या आर्थिक साहाय्याकडे आहे. अमेरिकेच्या परिस्थितीत व अमेरिकेच्या आगबोटींच्या दरांत बराच बदल घडल्यामुळे पुस्तकांतील माहिती अपूर्ण राहूं नये किंबहुना आजच्या परिस्थितीत गैर लागूं होऊं नये म्हणून आम्ही दोन परिशिष्ट द्वारां भारतीयांना अनुलक्षून असलेला अमेरिकन इमिग्रेशन अॅक्ट व प्रचलित आगबोटींचे दर शेवटीं दिलें आहेत. ही परिशिष्टांतील माहिती मुंबईच्या Thos Cook & Son ह्या कंपनीनें पुरविल्याबद्दल आम्ही सदरहू कंपनीच्या चालकांचे अत्यंत आभारी आहोत. स्वामी सत्यदेवांचा ब्लॉक तयार करून दिल्याबद्दल बालोद्यान कार्यालयाचे मालक एस. बी. सहस्रबुद्धे यांचे, हस्तलिखित प्रत तयार करण्याचे कामी सहाय्य केल्याबद्दल आमचे मित्र श्री० श्रीधर जनार्दन खोत यांचे व पुस्तक काळजीपूर्वक छापून देण्याचें कामीं परिश्रम घेतल्याबद्दल गणेश प्रिंटिंग वर्क्सचे मालक श्री० गणेश काशिनाथ गोखले व समर्थ प्रेसचे मालक श्री० श्रीपाद रघुनाथ राजगुरु यांचे आम्ही अंतःकरणपूर्वक आभार मानतों.

 महाराष्ट्र जनतेकडून सदरहू अभिनव ग्रंथमालेस योग्य आश्रय मिळेल अशी अपेक्षा बाळगून व ज्या श्रीरामचंद्र प्रभूचें कृपेंकरून हें अल्प कार्य घडून आलें त्याचें स्मरण करून आम्हीं हें आभार प्रदर्शनाचें काम संपवितों.
३६८ नारायण पेठ, पुणें

ता. १७ आक्टोबर १९२५

श्रीधर नारायण हुद्दार