पान:अभिवादन (Abhivadan).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ९५


आदरापोटी ते, काही मुद्द्यांचा उल्लेख न करता, गप्प बसतात, हा प्रश्न निराळा. महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्यावरील लेख या दृष्टीने पाहण्याजोगा आहे. महर्षी शिंदे यांचा जातिभेदावर विश्वास नव्हता. दलितांच्या व अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर त्यागपूर्वक सेवा केली, ही गोष्ट खरी आहे. पण, महर्षी शिंदे प्रार्थनासमाजाचे अनुयायी होते, याचा अर्थ हा की, ते रूढीचे विरोधक असले, तरी हिंदू धर्मातील उज्ज्वल परंपरा, तत्त्वज्ञान आणि भक्तिमार्ग याचे ते चाहते होते. या विशिष्ट चौकटीत राहून अस्पृश्योद्धार करण्याचा त्यांचा मनोदय होता. कनिष्ठ जमाती आणि शूद्र वर्ग यांना वरिष्ठ जमाती व धर्म यांच्या विरोधी संघर्षात उभे करण्याची त्यांची इच्छा नव्हती. महपी शिंद्यांच्या मराठा समाजाने काय किंवा दलित वर्गाने काय त्यांची ही भूमिका नाकारलेली आहे. म. फुले यांना जो आदर आणि आपुलकीचा लाभ झाला, तो योग शिंदे यांना कधी आलाच नाही. मही शिंदे हे एक त्यागी, समर्पित, निष्कलंक जीवन होते. पण, जी जीवनदृष्टी समाजाने नाकारली, तिचे ते प्रतिनिधी होते. त्यांचा ध्येयवाद सार्वजनिक जीवनात पराभूत ठरला आहे. माडखोलकरांना हे माहीत नाही, अशातला भाग नाही. पण, एका ध्येयवादी समर्पित जीवनाला श्रद्धांजली अर्पण करताना, ते असल्या बाबींचा उल्लेख करीत नाहीत.
 वाङमयाच्या क्षेत्रात आपण उतरलो म्हणजे माडखोलकर हे कोल्हटकरांचे शिष्य आहेत. निदान त्यांचे स्वतःचे असे म्हणणे आहे की, आपण कोल्हटकरांचे शिप्य आहोत. या संदर्भात त्यांनी गिरीश आणि तांवे यांच्याविषयी काय म्हटले आहे हे सोडून देऊन केळकर, कोल्हटकर व खाडिलकर यांचे मूल्यमापन त्यांनी कसे केले आहे, हे पाहिले पाहिजे. एक प्रकारे ही त्रयी म्हणजे त्यांना स्वत:ला गुरुस्थानी असणाऱ्या लेखकांतील प्रतिनिधी आहे. तरुण वयात माडखोलकर केव्हा ना केव्हा तरी या तिघांच्या वाङमयाने प्रभावित झालेले होते. आज इतक्या वर्षांच्यानंतर या मडळींच्याविषयी माडखोलकरांना काय वाटते ? नाटयाचार्य खाडिलकरांच्याविषयी त्यांचा आदर जवळजवळ शिल्लक आहे. खाडिलकरांच्या व्यक्तिगत सचोटीविषयी, धीरोदात्त व त्यागमय जीवनाविषयी ते कृतज्ञ आहेत. लो. टिळकांचे शिष्य व अनुयायी या नात्याने खाडिलकरांच्याकडे पाहण्याच्याऐवजी ते त्यांच्याकडे त्याग, पराक्रम, पौरुप यांची पूजा करणारे लेखक म्हणून पाहणे जास्त पसंत करतात. या सर्वांच्यापेक्षा वाङमयीन दृष्टीने माडखोलकरांचा एक मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. वाङमयविवेचकांच्या नजरेतून निसटलेला पण अतिशय मार्मिक असा हा मुद्दा आहे. तो मुद्दा असा की, खाडिलकर ज्या क्षणी संगीत रंगभमीकडे वळले, त्या क्षणी त्यांनी शेक्सपिअरचा हात सोडून दिला आणि किर्लोस्करांच्या नाट्यपरंपरेला ते अधिक निकटवर्ती झाले. या मुद्द्याचा मामिकपणा अगदी उघड