पान:अभिवादन (Abhivadan).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री ग. त्र्यं. माडखोलकर । ९३


है, ब्रिटिश राज्यात हिंदुस्थानचे प्रचंड आर्थिक शोषण चालू आहे, ही कल्पना मान्य करणारे नव्हते. यासंबंधीची आरंभीच्या काळातील त्यांची मते पुढे त्यांनी बदलून घेतली. पण, ब्रिटिशांच्या साहचर्यामुळे भारताचे आधुनिकीकरण, औद्योगीकरण घडण्याचा फार मोठा संभव निर्माण झालेला आहे, यावर त्यांची श्रद्धा होती. शोषणावर श्रद्धा नाही, विकासाच्या संभवावर श्रद्धा आहे, याचा समन्वय त्यांच्या राजकारणात दिसून आला, तर ते स्वाभाविक आहे. स्वतः माडखोलकर ब्रिटिश राजवटीचे कडवे विरोधक. पण ते रानड्यांच्याविषयी आदराने बोलणार. हेच माडखोलकर लोकहितवादींचे मात्र कठोर टीकाकार आहेत. ते लोकहितवादींना स्वकीयांचा उत्साहभंग करणारे, पारतंत्र्याचे उद्गाते मानतात.
 माडखोलकरांच्या या तीव्र रागलोभाचे कारण समजावून घेतले पाहिजे. हिंदू धर्मावरील टीका किंवा इंग्रजी राजवटीचे समर्थन यामुळे माडखोलकर चिडले आहेत, असे प्रथमदर्शनी दिसते. पण हे दिसणे खरे नव्हे. लोकहितवादींच्यावर त्यांचा खरा राग मुख्यत्वे दोन कारणांसाठी आहे. एक तर लोकहितवादी फक्त लिहीतच गेले. या पलीकडे जाऊन आपल्या श्रद्धेनुसार एखादी सामाजिक चळवळ जन्माला घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. दुसरे म्हणजे लोकहितवादींच्या वर्तनात आणि त्यांच्या लिखाणात कमाल विसंगती होती. आपले सर्वच विचार अमलात आणण्याचे धैर्य नसले, तरी चालेल; पण निदान काही विचार त्यागपूर्वक अमलात आणता आले पाहिजेत. आपले विचार समाजात रुजविण्यासाठी सामाजिक चळवळ निर्माण करण्याचा काही प्रयत्न तर केला पाहिजे. या किमान बाबीही जिथे नाहीत, असा बोलघेवडेपणा पाहिला, म्हणजे माडखोलकर तितकीच तीव्र प्रतिटीका करतात. म. फुले, डॉ. आंबेडकर ही माणसे काही हिंदू धर्माची कमी टीकाकार नव्हती; पण माडखोलकरांनी त्यांच्याविषयी अत्यंत आदराने लिहिलेले दिसून येईल. माडखोलकरांच्या आदराचे, अनादराचे कारण त्या व्यक्तींचे विचार हे अनुषंगाने असते- त्या व्यक्तींच्या कृतिशील सचोटीवरील त्यांचा विश्वास हे प्रामुख्याने असते. माडखोलकरांनी अनेकांच्यावर विरोधी टीका केली आहे. त्यांच्या मतांशी सर्वांना सहमत होणे कठीणच. पण या टीकेचा रोख लक्षात घेतला, तर बहुधा ज्यांच्या सचोटीविषयी त्यांना खात्री आहे, त्यांच्याशी मतभेद त्यांनी गौण मानलेले दिसतात.
 माडखोलकरांची ही मनोवृत्ती, त्यांनी 'रामदासानुदास' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रो. परांजपे यांच्याविषयी जे लिहिले आहे, त्यातही दिसून येते. हे श्रीधरबुवा केकावलीचे विद्वान भाष्यकार होते. या केकावली भाष्याचे कौतुक माडखोलकरांनी पुष्कळ केले आहे. खरे म्हणजे केकावली हा काही तत्त्वज्ञानपर प्रबंध नव्हे. एका पंडित कवीची ती पांडित्यपूर्ण भक्तीची रचना आहे. केकावलीत पाहायचे असतील, तर यमकअनुप्रासासारखे शब्दालंकार, अनेकविध प्रकारचे अर्थात