पान:अभिवादन (Abhivadan).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


९२ । अभिवादन



असतातच, असे नव्हे. किंबहुना, त्यांना आपण कलाकृतींचा दर्जा देऊ, असेही नव्हे. पण, या सर्व बाबी विवाद्य मानल्या, तरी या साहित्यकृती काळाच्या ओघात टिकलेल्या असतात, हे निर्विवाद सत्य मान्य करून त्यांचा नव्याने विचार करावा लागतो. चाळीस वर्षे संपल्यानंतर, माडखोलकरांच्या वाङमयाचा, त्यातील सामर्थ्याचा नव्याने विचार करण्याची वेळ आज आलेली आहे, असे मला वाटते. अर्थातच नव्यानेच विचार करायचा, तर त्यांचे दोष आणि मर्यादा यांचाही नव्याने विचार करावा लागेल.
 माडखोलकरांच्या कादंबऱ्यांत सत्य आणि कल्पित यांच्यातील पडदा अगदीच झिरझिरीत आहे ही गोष्ट लक्षात घेतली, तर या कादंबरीवर असणारे प्रभाव लक्षात घेता येतात. त्यांच्या तीव्र आवडीनिवडीही लक्षात घेता येतात. माडखोलकरांच्या कायम आवडीचे विषय राजकारण आणि क्रान्ती हे राहिलेले आहेत. एक तर ते पत्रकार होते व आहेत. दुसरे म्हणजे राजकारणाच्या अंतरंगात ते वावरत होते. त्यामुळे या कादंबऱ्यांच्यामधून असा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते. सर्व सशस्त्र क्रान्तिकारकांच्या विषयी अत्यंत आत्मीयता, हिंदू समाजाच्या भवितव्याविषयी चिता, समाजवादाविषयीची ओढ आणि म. गांधींच्याविषयी राग हे त्यांच्या कादंबऱ्यांच्यामधील कायम विषय आहेत. विशेषतः काँग्रेसच्या राजकारणाविषयी त्यांच्या मनात फार राग असतो. या काँग्रेसच्या राजकारणाला गांधी जबाबदार आहेत, म्हणूनच त्यांचा गांधींच्यावर राग असतो. या कादंबऱ्यांच्यामधून कम्युनिस्टांचे व अस्पृश्य वर्गाचे पुष्कळच सहानुभूतीने चित्रण केलेले असते. पण, या कादंबऱ्यांत उत्कट राष्ट्रवाद सोडल्यास, हिंदुत्ववादाची फारशी प्रबल ओढ दिसत नाही. पत्रकार माडखोलकरांच्याही लिखाणाचे स्थूलपणे हेच वैशिष्टय आहे.
 जी माणसे एकेका ध्येयवादाने भारून जातात आणि तो अमलात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात, त्यांच्याविषयी माडखोलकरांना विशेष आस्था आहे. विशेषतः त्यांची श्रद्धा असणारी एखादी बाब जर कुणाच्या जीवनात दिसली, तर मग माडखोलकर अशा व्यक्तीचे समर्थन करू लागतात. त्या व्यक्तींनी आपल्याला नावडती असणारी मते जरी मांडलेली असली, तरी मांडखोलकर ती क्षम्य मान लागतात. हा त्यांच्या आवडीनिवडीतील फरक विशेषतः न्या. रानडे आणि लोकहितवादी या दोघांच्याविषयी त्यांनी जे लिहिलेले आहे, तिथे ठळकपणे दिसू लागतो. न्या. रानडे हे समाजसुधारक, मवाळ आणि इंग्रजी राज्याचे चाहते. लोकहितवादीसुद्धा समाजसुधारक व इंग्रजी राज्याचे चाहते. दोघेही हिंदूंच्या चालीरीतींचे टीकाकार. दोघांचाही नैतिकतेवर अतिशय कटाक्ष. इतके असून माडखोलकर न्या. रानड्यांना एकोणिसाव्या शतकाचे युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष मानतात. रानड्यांच्याविषयी लिहिताना शक्य तितके झुकते माप देण्याची त्यांची पद्धत आहे. न्या. रानडे