पान:अभिवादन (Abhivadan).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


९० । अभिवादन



स्वतःला जितके शत्रू करून घेतले आहेत, तितके मराठीत त्यांच्या पिढीतल्या फार थोड्या लेखकांनी करून घेतले असतील. सामाजिक . दायित्वाविषयी बेफिकीर राहून, आपल्या कोशात विसावलेल्या मंडळींना समाजाने मोठ्या प्रेमाने वागवावे आणि आपले सामाजिक दायित्व पार पाडताना प्रत्येक प्रश्नावर स्वच्छ आणि स्पष्ट मते देणाऱ्या व्यक्तीचा मात्र राग करावा, ही सार्वजनिक जीवनातील नित्य दिसणारी विसंगती आहे. विचारस्वातंत्र्य हे आपल्या प्रतिष्ठेला आडवे जात नाही, आपल्याला जखमी करीत नाही, तोपर्यंतच माणसाला आवडते. हे समर्थन माडखोलकरांच्या विचारांचे अगर मतांचे नव्हे. कारण विचारांच्या क्षेत्रात त्यांचे माझे अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. हे फक्त स्पष्टपणे विचार मांडणाऱ्या माणसाचे समर्थन आहे, मग त्याचे विचार काहीही असोत. दंभापेक्षा फटकळपणा अधिक आदरणीय असतो, असेच निदान मी तरी मानतो.
 माडखोलकरांची वाङमयीन टीका ही तर त्यांच्या पत्रकारितेने खोल प्रभावित झालेली आहेच; पण त्यांची कादंबरीही या पत्रकारितेचेच एक वेगळे रूप आहे. आणि, कादंबरीच्या क्षेत्रात कोल्हटकर व केळकर या आपल्या दोन्ही गुरूंच्यापेक्षा, माडखोलकरांचे यश किती तरी पटीने उजवे आहे. माडखोलकरांनी राजकारणात, समाजकारणात जे पाहिले, त्याचे या कादंबऱ्यांमधून चित्रण आहे. भाषाशैली आणि शंगारवर्णन काही प्रमाणात अपवाद केले, तर मग माडखोलकरांच्या कादंबरीत फारसे काल्पनिक असे काही नाही. त्यांच्या कादंबऱ्यांच्यामध्ये जे वास्तविक जीवनाचे चित्र आलेले आहे, त्यावर कल्पिताचा पडदा फार झिरझिरीत आहे. पण यामुळेच त्यांच्याविषयी दोन प्रकारचे आक्षेप निर्माण झालेले आहेत. एक तरं त्यांच्या कादंबऱ्या अवास्तव आहेत, अशी तक्रार आहे. दुसरी तक्रार अगदी विरुद्ध दिशेने, म्हणजे या कादंबऱ्या केवळ वृत्तान्तवजा अशा आहेत, ही आहे. म्हणजे जर माडखोलकर या कादंबऱ्यांतील प्रसंग वास्तविक आहेत म्हणून सांगणार असतील, तर टीकाकार असे म्हणणार की, कल्पिताच्या पातळीवर फारशी नवनिर्मिती इथे नाही, म्हणून ही चांगली कादंबरी नव्हे. कोणताही खुलासा न करता माडखोलकर गप्प बसले असते, तर मग हे सगळेच खोटे आणि काल्पनिक आहे, त्यात वास्तवाचा अंश नाही, असे म्हणण्यास टीकाकार पुन्हा मोकळे होते.
 मराठी वाङमयसमीक्षा पाहताना मला एक प्रश्न नेहमीच खटकत आलेला आहे. एखादा लेखक समाजात झपाटयाने लोकप्रिय होत असेल, तर तो लोकप्रिय का होतो, हे सांगण्याची जबाबदारी प्रायः समीक्षक टाळताना दिसतात. ही लोकप्रियता क्षणकालिक असेल, तर तिचे कारण वेगळे दिले पाहिजे. पण, ही जर दीर्घजीवी असेल, तर तिचा शोध वेगळा घेतला पाहिजे. खांडेकर, माडखोलकर, गडकरी यांच्यासारख्या लेखकांच्याबाबत हा प्रश्न माझ्या मनात नेहमीच येत राहिला.