पान:अभिवादन (Abhivadan).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ८९



 हीच त्यांची पद्धत वाङमयात वावरतानाही राहिली. मराठी साहित्यिकांच्याविषयी त्यांच्या वैयक्तिक जीवनाची विपुल माहिती माडखोलकरांनी जतन केली. अधून मधून तिचा उच्चारही केला. असा उच्चार झाला म्हणजे एक वर्ग खवळन जात असतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्याविषयी त्यांनी जेव्हा लिहिले, त्या वेळी आचार्य अत्रे असेच उसळले होते. लक्ष्मीबाई टिळकांच्याविषयीसुद्धा माडखोलकरांनी लिहिले, त्या वेळी पेल्यात एखादे वादळ उठावे तसा प्रकार झालाच. याही पुस्तकात तांबे, गडकरी, बालकवी यांच्याविषयी सूचक उल्लेख आहेत. त्यामुळे काहीजणांची मने दुखावली जाण्याचा संभव आहे. या सगळ्या रागलोभाचे कारण, माडखोलकर सांगतात ती माहिती खोटी असते, हे नव्हे. पुष्कळदा माडखोलकर प्रथम विधान करतात, नंतर खुलासा करतात. पण त्यांचे खुलासेही मूळ विधान मागे घेणारे नसतात, हे वारकाईने पाहणान्यांच्या लक्षात येईल. माडखोलकरांच्यावर लोकांचा राग ते खोटे सांगतात यासाठी नसून, प्राय: वैयक्तिक जीवनाविषयी प्रकाशित व्हावयाला नको असणारे सत्य सांगतात, याविषयी आहे. तुम्ही सांगता ते खरे असले, तरी तुम्ही गप्प का बसला नाहीत, असा हा मुद्दा असतो.
 माडखोलकरांच्या या सर्व लिखाणाला एक महत्त्व आहे. मराठीत चरित्रपर टीका फारशी विकसित झालेली नाहीच. कोणत्याही लेखकाच्या चरित्राच्या संदर्भात वाङ्मय समजावून घ्यावे, वाङमयातील गूढांचा चरित्राच्या आधारे अन्वय लावावा, हे अजून मराठीत शक्य होत नाही. कारण, साहित्यकारांच्या खन्या चरित्राचे तपशील जाहीर रीतीने मांडण्यापेक्षा, ते झाकन ठेवण्याकडे प्रवृत्ती जास्त असते. कोल्हटकर, माधव जूलियन, गडकरी, वालकवी इत्यादिकांच्या बाबतीत हा चरित्रावर पडलेला पडदा आता कुठे अमळ विरविरीत होऊ लागला आहे. या सान्या लिखाणामुळे कलावंतांच्या चरित्रलेखनातील संकोच मावळायला मदत झाली, तर तिचा परिणाम मराठीत चरित्रपर टीका सकस होण्यास होईल. अर्थातच कलावंताच्या चरित्रात एखादे लफडे नसतेच असे नाही आणि अशी एखादी भानगड त्याच्या मानसिक विश्वाचे सारसर्वस्व असते, असेही नाही. हे लक्षात घेऊनच चरित्रांची तपासणी व्हायला पाहिजे.
 माडखोलकरांनी वाङ्मयसमीक्षा भरपूर केलेली आहे. या वाङ्मयसमीक्षेत, प्रत्यक्ष कलाकृतीच्या विश्लेषण, मीमांसेपेक्षा, त्या कलाकृतीच्या चौरस आकलनाला उपयोगी पडेल, अशी विविध प्रकारची माहिती पुरविण्यावर त्यांचा भर राहिला आहे. स्वतःच्या वाङमयाची कहाणी त्यांच्याइतक्या तपशिलाने इतर लेखकांनी मराठीत क्वचितच सांगितली असेल. आपल्या समकालीनांच्याविषयी इतके कौतुकाने आणि गुणग्रहणपर फारच थोड्यांनी लिहिले आहे. आणि तरीही, माडखोलकरांनी

अ...६