________________
कारण, समाजकारण, साहित्य, समीक्षा, संशोधन आणि विविध प्रकारची माहिती यांचा ते संग्रह करीत आले. या माहितीचा त्यांनी अन्वय लावला, मीमांसाही केली. मराठी वृत्तपत्रसृष्टीत एका नियतकालिकाचे संपादक म्हणून जेव्हा माडखोलकरांच्याकडे आपण पाह लागतो, तेव्हा इतका दीर्घ काळ या क्षेत्रात वावरलेले अतिशय चौरस व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे केळकरांचे वारसदार म्हणून पाहावे लागेल. तात्यासाहेब केळकरही असेच अफाट परिवार असणारे, दीर्घोद्योगी गृहस्थ होते. आणि, केळकरही असेच सर्वांना हवेसे वाटणारे- पण कुणालाही खात्रीलायकपणे आपले न वाटणारे,- गृहस्थ होते. केळकरांनी केलेले प्रत्यक्ष राजकारण आणि केळकरांचा संस्थात्मक व्याप या बाबी माडखोलकरांच्याजवळ नाहीत. पण, पत्रकार म्हणून केळकरांचा चौरसपणा आणि सर्वसमावेशक सहानुभूती माडखोलकरांच्याजवळ भरपूर आहे. असेच एक चौरस व्यक्तिमत्त्व मराठी नियतकालिकात आचार्य अत्रे यांचे होते. पण, अत्र्यांच्या वृत्तपत्राचा भर नियतकालिकातील बातम्यांच्यापेक्षा, अग्रलेखावर जास्त होता. आणि, अग्रलेखातही, एखाद्या प्रश्नाची माहिती सांगण्यापेक्षा, इतरच बाबींवर त्यांचा भर जास्त होता. विरोधकांशी वागताना आचार्य अत्रे यांना तोल कधी सांभाळता आला नाही. त्यांना बातमीची उपयोगिता व महत्त्व यांपेक्षा बातमीतील नाटय महत्त्वाचे होते. विश्लेषणापेक्षा अतिशयोक्तीवर त्यांचा भर जास्त होता. माडखोलकरांचा भर चौफेर आणि चौरस माहितीवर आहे.
एका बाबतीत माडखोलकर सुदैवी राहिले. राजकारणाच्या अंतरंगाचे ते नेहमी साक्षीदार राहिले. दर्शनी भागात राजकारणाचे चित्र जे दिसते, त्यापेक्षा किती तरी निराळे असे खेळ पडद्याआड चाललेले असतात. स्वार्थ, क्रौर्य, गटबाज्या, कारस्थाने, मनाचा हीणकसपणा हा तर पडद्यामागे असतोच; पण सत्तेचा उन्माद, मनातील कटुता आणि भोगविलासाचे एक विचित्र भ्रष्ट थैमान हेही पडद्यामागच्या दृश्यात महत्त्वाचे असते. या ठिकाणी त्यांनी अनेकांच्या राजकीय चढउताराचे विविध खेळ पाहिले. डॉ. ई. राघवेंद्र राव व पं. द्वारकाप्रसाद मिश्र यांच्यासारख्या मुरलेल्या चाणक्यांच्या निकट वर्तुळात ते दीर्घ काळ राहिले. या अंतरंग परिचयाचा काही भाग त्यांच्या कादंबऱ्यांतून आलेला आहे. यातील पुष्कळसा भाग त्यांच्या मृत्युलेखांतूनही आलेला आहे. या मृत्युलेखांत माडखोलकरांनी जाणीवपूर्वक काही माहिती विखरून ठेवलेली असते. तिची संगती लावून पाहणे हाही एक उद्याच्या राजकारणाच्या अभ्यासकांना उद्योग होऊन बसणार आहे. मात्र या माहितीपैकी आजतागायत स्फोट झाला असेल, तर तो सार्वजनिक दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या वाबींचा. उद्या माडखोलकरांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध होईल, तेव्हा पूष्कळच विलक्षण माहिती उजेडात येईल, असे मानण्यास जागा आहे. माडखोलकरांनी यातील काही घटनांची कल्पना माझ्याशी खासगी बोलताना दिलेली आहे.