पान:अभिवादन (Abhivadan).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


८६ । अभिवादन



करते. गुणकर्माधिष्ठित चातुर्वर्ण्याचा पुरस्कार हा असा मूलतः सनातनी असणाऱ्या मनाचा एक खेळ आहे. भगवद्गीतेत ज्या गुणकर्माचा उल्लेख केलेला आहे, ते गुणकर्म म्हणजे व्यक्तीची या जन्मातील प्रवृत्ती आणि तिचे कर्म नसून, गतजन्मातील तिची प्रवृती आणि कर्म आहे. वर्णव्यवस्था नेहमीच जन्मजात अशी राहिली. ती या जन्मीच्या गुणकर्मावर कधीच अवलंबून नव्हती. ती परमेश्वरप्रणीत आणि गतजन्मीच्या गुणकर्मावर आधारलेली आहे, हे भगवद्गीतेचे मत पुन्हा एकदा वर्ण जन्मसिद्ध असतो, हेच सांगत असे. माडखोलकर गीतेच्या या श्लोकाचा अर्थ असाच लावतात, हे मला माहीत आहे. अर्थात ते वर्णव्यवस्थेचा कोणत्याच स्वरूपात कधीही पुरस्कार करीत नव्हते. इ. स. १९२५-२६ पासून ते या मताचे राहिले की, वर्णव्यवस्थेच्या कल्पनेला संपूर्ण तिलांजली दिल्याशिवाय यापुढे हिंदू धर्माला तरणोपाय नाही. नेमके हे ते कारण आहे की, ज्यामुळे अत्यंत आदर असूनसुद्धा, कै. डॉ. हेडगेवार आणि कै. गोळवलकरगुरुजी यांच्या अनुयायांत ते समाविष्ट होऊ शकले नाहीत.
 वर्णव्यवस्थेची चर्चा ही तात्त्विक चर्चा असते. व्यवहारात परपरागत चालीरीती आणि जातिव्यवस्था या संबंधात तुम्ही काय भूमिका घेता, हा प्रश्न महत्त्वाचा असतो. माडखोलकरांनी कधी धर्माचा परंपरागत आचार निष्ठेने पाळला नाही. त्यांच्याकडून काही धार्मिक कृत्ये घडली असतील, तर तो औपचारिक भाग होता. त्यांच्या घरात विविध जातिधर्माचे लोक नेहमीच घरच्याप्रमाणे वागत आले. या मंडळींत नुसते अस्पृश्यच नव्हते, तर ख्रिश्चन आणि मुसलमानही होते. माडखोलकरांनी आंतरजातीय विवाहाचा तर पुरस्कार केलाच, पण वेळ आली तेव्हा महाराष्ट्रभर गाजलेल्या खान-मालिनी या आंतरधर्मीय विवाहाचाही पुरस्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धधर्म स्वीकारला, त्याचे त्यांनी स्वागत केले. त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारात जात कधीच नव्हती. त्यांनी अस्पृश्य तरुणाचा आपला मुलगा म्हणून उल्लेख केलेला मी पाहिला आहे. सर्व सामाजिक सुधारणा, व्यक्तीच्या समतचे सर्व प्रकार आणि जातिभेद मोडण्याचे सर्व कार्यक्रम यांना माडखोलकरांनी आयुष्यभर उचलून धरले. त्यामुळे दलित वर्गात त्यांना एक मोठे मित्रवर्तुळ मिळाले.
 सामाजिक बाबतीत ते समता आणि स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते राहिले. आर्थिक बाबतीत परंपरागत अर्थरचना त्यांना कधीही मान्य नव्हती. ते उत्पादनव्यवस्थेत आधुनिकीकरणाचे आणि वितरणव्यवस्थेत समाजवादाचे पुरस्कर्ते राहिले. कोणत्याही ग्रंथाच्याविषयी प्रामाण्य नसणारा, हिंदूंच्या परंपरागत समाजरचनेचा विरोधक, व्यक्तिगत जीवनात सर्व जातिधर्मात जिव्हाळ्याची नातीगोती असणारा, अर्थव्यवस्थेत समाजवादी असा हा माणूस लोकसमजाच्या दृष्टीने मात्र नेहमीच हिंदुत्ववादी मानला गेला. माडखोलकरांच्यामध्ये हिंदुत्व असेल, तर ते इतक्याच अर्थाने आहे