Jump to content

पान:अभिवादन (Abhivadan).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


८२ : अभिवादन



दिली नाही. ते मराठवाड्यातील सर्व साहित्यप्रेमीयांचे बरोबरीचे मित्र राहिले. या घटनेचे महत्त्व आमच्या मंडळींनी अचूक ओळखले होते. म्हणून ते माडखोलकरांना आपले मानीत. पुढे मराठवाडा साहित्यपरिषदेचे कामकाज सुरू करण्याची धडपड सुरू झाली. पहिले आणि दुसरे निजामप्रांतीय मराठी साहित्य संमेलन झाले. पण, संमेलने व्हावीत आणि जोम ओसरून जावा, असेच घडू लागले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष माडखोलकर होते. माडखोलकर आल आणि तीन दिवस संमेलन आटोपून परत गेले, असे घडले नाही. 'संमेलन संपल्यावर ते पुन्हा मराठवाड्यात आले. त्यांनी मराठवाड्यात व्यापक असा दौरा काढला. ठिकटिकाणी व्याख्याने दिली. मराठवाडा साहित्य परिषदेचे एका साहित्य संघटनेत रूपांतर केले. एका प्रतिकूल परिस्थितीत निझामी राजवटीत त्यांनी वाङमयाच्या द्वारे एक नवा हुरूप व उत्साह दिला. मराठवाडा साहित्य परिषदेची मांडामांड प्रथमतः त्यांच्या हातची आहे. पोलिस अॅक्शननंतर नव्या वातावरणात या संघटनेची फेरमांडणी प्रो. रा. ब. माढेकर, श्री. न. शे. पोहनेरकर आणि माझे गुरुवर्य प्रो. कहाळेकर यांनी केली. ज्या दिवशी मी मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष झालो, त्या दिवशी मला ज्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे कर्तव्य वाटले, त्यांत भाऊसाहेब माडखोलकर यांचे नाव अग्रहक्काने होते.
 मराठवाडा हा नेहमीच संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता आणि त्या कल्पनेला विनशर्त पाठिंबा देणारा असा भाग राहिला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरून आग्रहाने पुरस्कारिण्यात, या धोरणाचा प्रचार, प्रसार करण्यात आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची घडण घडविण्यात माडखोलकर अग्रभागी राहिले. विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्राचा नेहमीच कच्चा दुवा राहिला, याची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्राने स्वीकारली पाहिजे. दीर्घ काळपर्यंत पश्चिम महाराष्ट्राचे लोक आपण म्हणजे महाराष्ट्र असे गृहीत धरीत आले. पुण्याला पुण्याच्याबाहेर पाहण्यास वाव नव्हता. मुंबईपुण्यात सुहृद्भाव असावा याचीही चिंता ज्या मंडळींनी केली नाही, त्यांना विदर्भ आणि मराठवाड्याचे मन जिंकण्याची जबाबदारी समजणे कठीणच होते. पश्चिम महाराष्ट्राविषयी तीव्र अविश्वास हे उरलेल्या महाराष्ट्राचे सामान्य वैशिष्ट्य राहात आले. अशा प्रकारच्या भावना सकारण निर्माण होवोत की अकारण निर्माण होवोत,-त्या दूर करण्याची, त्यांचा निरास करण्याची जबाबदारी जे सर्वांत जाणते होते त्यांच्यावर असते. शंभर सव्वाशे वर्षे एक घटना चालू राहिली, म्हणजे तिच्यात हितसंबंध निर्माण होतात.
 निझामी राजवटीत आम्ही अत्यंत गांजलेले आणि पीडित होतो. तिथे भाषेच्याही विकासाला वाव नव्हता, जीवनाच्या कोणत्याच अंगाच्या विकासाला