पान:अभिवादन (Abhivadan).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कै. कहाळेकर व रसचर्चा । ७५


सारखा परिणाम होतो असे मानणे मला कवितेच्या उपयोगाचे वाटत नाही.
 मी विचारले, ते कवितेच्या उपयोगाचे नसेल पण परमार्थाच्या उपयोगाचे आहे काय ? कहाळेकर म्हणाले, नाटके पाहत रात्री जागवाव्यात आणि दिवसा गाढ झोपताना योग्याच्या समाधीसदृश अवस्था प्राप्त झाली असे समाधान मानावे ही गोष्ट परमार्थाच्या नावे आपलेच भोगविलास प्रतिष्ठित करणाऱ्यांनाच फक्त उपयोगी ठरू शकेल. पण मला अभिनवगुप्ताच्या विवेचनात मोक्षाचे काय झाले याची चिंता नाही. माझ्यासमोर चितेचे विषय दोन आहेत. एक म्हणजे जे तत्त्वज्ञान म्हणून वेदान्त स्वीकारीत नाहीत त्यांनाही रसव्यवस्था स्वीकारता येईल काय? दुसरे म्हणजे या सगळ्या विवेचनात स्थायीभावांचे काय होणार ? विभावादिक ही जर निजत्वनिरास करणारी सामग्री असेल तर ती प्रेक्षकांचेही स्थायीभाव जागृत करू शकणार नाही.
 मी म्हटले, प्रेक्षकांच्या मनात स्थायीभाव असतातच. ते सार्वत्रिक आणि जन्मजात आहेत असे अभिनवगुप्त मानतो. कहाळेकर म्हणाले, जे भाव सार्वत्रिक आणि जन्मजात आहेत म्हणजे सहजप्रेरणांच्या सारखे आहेत त्यांना आपण लौकिक म्हटले पाहिजे. अभिनवगुप्त विभावादी सामग्री अलौकिक मानतात. अलौकिक साधनांनी ललितवाङमयात लौकिक परिणाम साधले जातात, असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? लौकिक परिणामच साधायचे असतील तर मग लौकिक साधने जास्त सुलभ नाहीत काय ? आणि जर अलौकिक विभावांनी प्रेक्षकांच्या मनात अलौकिक स्थायीभाव जागा होतो असे म्हणायचे असेल, तर प्रेक्षकांच्या मनात लौकिक जन्मजात, सार्वत्रिक भावांच्या बरोबर अलौकिक जन्मजात, सार्वत्रिक स्थायीभाव आहेत असे मानावे लागेल. अलौकिक भावभावना प्रत्येकाजवळ जन्मजात आणि सार्वत्रिक आहेत हे म्हणणे निरर्थक आहे. कारण जे जन्मजात आणि सार्वत्रिक असते ते लौकिक असते. पण समजा आपण असे गृहीत धरले की, प्रेक्षकांचे अलौकिक स्थायीभाव जागे होतात तरी त्यामुळे काय होईल ? अलौकिक स्थायीभाव हा काही आत्मा नव्हे आणि मग विभाव हे निजत्व निरास करणारे नव्हेत आणि जर आवरण भंग करून चैतन्य अनावृत करावयाचे असेल तर मग या मीमांसेत स्थायीभावांची जागा कोणती, हे समजणे कठीण आहे.
 रसचर्चेच्या ओघात एकदा मी विचारले, तुम्ही ललितवाङमयामुळे लौकिक भावना निर्माण होतात असे मानता काय ? कहाळेकर म्हणाले, हा प्रश्न थोडा घोटाळ्यात पाडणारा आहे. कवितेतील व्यक्ती जेवण जेवते आहे आणि त्यामुळे आपली भूक भागते आहे असे वाङमयात घडण्याचा संभव आहे काय, असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर उघडच नाही असे आहे. कारण तसे जर असते तर महाभारतातील राजसूय यज्ञप्रसंगीच्या भोजनांची वर्णने वाचून