पान:अभिवादन (Abhivadan).pdf/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


७४ । अभिवादनव्यक्तींच्या संदर्भात निष्पत्ती म्हणजे उत्पत्ती असा लावला असता, ही लोल्लटाची भूमिका आहे. आणि नटांच्या संदर्भात रससूत्राचा अर्थ लावताना निष्पत्ती म्हणजे अनुकृती म्हणजेच अभिनय असा लावला असता. हीच शंकुकाची भूमिका आहे. नाटकांसाठी असणारा सिद्धांत काव्यासाठी लावणे यात अयोग्य काहीच नाही. पण मग तारतम्य पाळले पाहिजे. परंपरेचे अभ्यासक नाट्यशास्त्रात प्रकृतिविचार, भूमिकाविचार असे दोन स्वतंत्र अध्याय आहेत, हे रसचर्चा करताना विसरूनच जातात.
 अशीच एकदा चर्चा अभिनवगुप्तावर निघाली होती. कहाळेकरांचे म्हणणे असे की, उपनिषदात आत्म्याला रस म्हटले आहे. आणि आत्मा आनंदमयी मानला आहे. म्हणून रस आनंदमय आहे, आनंदस्वरूप आहे ही उपनिषदांची भूमिका. उपनिषदे ज्या आत्मवस्तूला रस मानतात ती आत्मवस्तू काव्यशास्त्रात खेचून सबंध काव्यानुभव पारमार्थिक अनुभवाचा एक प्रकार करून टाकण्याचा पहिला धाडसी प्रयत्न भट्टनायकाने केला आहे. अभिनवगुप्त हेच आत्म्याचे विवेचन काव्यचर्चा म्हणून आपल्या स्वतंत्र पद्धतीने मांडतात. या विवेचनामुळे त्या मध्ययुगात काही महत्त्वाचे मुद्दे प्रस्थापित झालेले आहेत. पण त्यामुळेच वाङमयविचारात काही महत्त्वाचे अडथळेही निर्माण झाले आहेत. समकालीनांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ही की, कवी रसिकांना पारमार्थिक अनुभव देण्याइतका पूज्य व आदरणीय ठरला. दुसरे म्हणजे उपनिषदांविरुद्ध जाणारा विचार चूकच असला पाहिजे हे आपोआप लोकांना कळू लागले. पण या सगळ्या प्रयत्नांत अनेक कल्पना मुळापासून बदलाव्या लागल्या. जर रस हा आत्मा असेल तर मग तो अजर, अमर असल्यामुळे उत्पन्न होऊ शकत नाही, हे उघड आहे. तो फक्त झाकलेला असतो. प्रकट होऊ शकतो. म्हणून रस उत्पन्न होत नाहीत, अभिव्यक्त होतात असे अभिनवगुप्ताने म्हटले आहे. हे रसांना अभिव्यक्त करणारे विभाव, अनुभाव संचारीभाव रस अभिव्यक्त करतात. म्हणजे नेमके काय करतात? सकल प्रकाशाचा प्रकाशक असा जो आत्मा त्याचेही प्रकाशक असे विभावादी आहेत काय? हे शक्यच नाही. ब्रह्मावर जसे मायेचे आवरण असते तसे माणसाच्या मनात त्याच्या लौकिक जाणिवांचे आवरण असते. आत्मा प्रकाशित होण्यासाठी हे वरचे आवरण निरस्त झाले पाहिजे. अभिनवगुप्ताने विभावादी सामग्री अपसारक विघ्न दूर करणारी अशी मानली आहे. हे विघ्न कोणते ? तर निजत्वभाव हे विघ्न आहे. म्हणून नाटकातील विभावादी सामग्री निजत्वनिरास करते असे अभिनवगुप्त मानतात. हा निजत्वनिरास झाला म्हणजे रस अभिव्यक्त होतो. म्हणजेच स्वयंप्रकाश आत्मा आनंदमय स्वरूपात व्यक्त होतो. ही सगळी काव्यचर्चा करण्याची पद्धत मला धोक्याची वाटते. कारण शंकराचार्यांचे शारीरिक भाष्य व कालिदासाचे शाकुंतल या दोहोंचाही मानवी मनावर सारखा