पान:अभिवादन (Abhivadan).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कै. कहाळेकर व रसचर्चा



अर्थाने नसून इतर आनुषंगिक अर्थाने आहे व त्याचा अर्थ आत्मा, गाभा, सार, महत्त्वाची बाब असा घ्यायला पाहिजे, असे तुम्हाला वाटत नाही काय? कहाळेकर म्हणाले, तरीसुद्धा रसात स्थायीभाव हा गाभा असतो असा अर्थ निघतो. हा स्थायीभाव कुणाचा, असा एक प्रश्न आहे. आपण त्याच त्याच मुद्दयाभोवती गोल फिरतो आहोत काय?
 नाट्यशास्त्रात सर्व व्यभिचारीभावांचे वर्णन विभावांनी उत्पन्न होतात, अनुभवांनी त्यांचा अभिनय करावा असे आलेले आहे. यामुळे रससूत्रात एकदा विभाव, अनुभावाचा उल्लेख आल्यानंतर पुन्हा व्यभिचारी भावांचा उल्लेख का यावा, हे मला समजत नाही असे ते म्हणत. त्यांनी दोन रससूत्रे बनवलेली होती. पहिले रससूत्र, विभावानुभाव संयोगात रसनिष्पती, होते. आणि दुसरे रससूत्र स्थायी, संचारी संयोगात रसनिष्पती असे होते. जर संचारी भावांनी स्थायीभाव पुष्ट होत असेल तर दुसरे सूत्र पुरेसे आहे. जर स्थायी संचारी दोन्ही विभावांनी व्यक्त होणारे, अनुभावांनी अभिनित होणारे असतील तर मग पहिले सूत्र पुरेसे आहे. आणि जर असलेले रससूत्र स्वीकारायचे असेल तर विभाग कुणाचे, या प्रश्नाचे उत्तर देणे भाग आहे. जर विभाव नायकाचे असतील तर मग रस काव्यनायकगत होतो. एकदा ते म्हणाले, ही अभिनय नावाची कल्पनासुद्धा समजून घ्यायला पाहिजे. कारण या कल्पनेत मला पुष्कळच चमत्कारी बाबी आढळतात. अभिनय कोण करतो, याचे एकदा उत्तर दिले पाहिजे. मी म्हटले, हा प्रश्न बावळटपणाचा आहे. कारण अभिनय नट करतो हे उघड आहे. कहाळेकर म्हणाले, जर नट अभिनय करीत असेल तर त्या अभिनयाला काही हेतू असला पाहिजे. मी म्हटले, काव्यार्थ प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हा अभिनयाचा हेतू आहे. कहाळेकर म्हणाले, जेव्हा आपण कविता वाचतो तेव्हा अभिनय कुणीच करीत नाही. अशा वेळी काव्यगत पात्रांच्याविषयी काय म्हणावे? द्रौपदी रडू लागली असे म्हणावे की द्रौपदी रडण्याचा अभिनय करू लागली असे म्हणावे? मी म्हटले, नाटकात नटी रडण्याचा अभिनय करू लागली असे म्हणावे. आणि काव्य असो, नाटक असो, द्रौपदी रडू लागली असे म्हणावे. कहाळेकर म्हणाले, कवीच्या मनाबाहेर आणि प्रेक्षकांच्या मनाबाहेर काव्यगत व्यक्तींना एक स्वतंत्र अस्तित्व असते असे आपण मानू लागलो आहोत. या काव्यगत व्यक्तींना स्वतंत्र अस्तित्व असते हे मानल्याशिवाय अभिनय या कल्पनेला अर्थ नाही. आणि हे मानल्यानंतर रस प्रेक्षकगत असतो या भूमिकेला अर्थ नाही. काव्यगत व्यक्तींच्या अस्तित्वाचे सत्ताशास्त्रीय स्थान कोणते, हा प्रश्न विचारणे विसरून गेल्यामुळे रसव्यवस्थेत अनेक घोटाळे निर्माण झालेले आहेत. नाहीतर आपण रससूत्राचा अर्थ काव्यगत

अ...५