पान:अभिवादन (Abhivadan).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


७० । अभिवादन




 ते म्हणाले, असे आहे पाहा की, रसप्रधान नायकच असतो. उरलेल्या ग्रौण पात्रांचा रस समजायचा नाही. अर्जुनाच्या युद्धाच्या वेळी भोवतालचे सैनिक प्राणभयाने आक्रोश करू लागले तरी प्रधान भोक्ता अर्जुन. म्हणून तिथे वीर रस समजायचा. भीम आणि दुर्योधन लढू लागले म्हणजे भीम प्रधान समजायचा व रस वीर समजायचा. मात्र भीम दुःशासनाशी लढताना लढतो आहे तोवर रस वीर असतो. दुःशासनाची छाती फोडून रक्त पिऊ लागला म्हणजे रस रौद्र समजायचा. पण या सगळ्या चर्चा करताना शाकुंतलाच्या पहिल्या अंकात जर हरीण भ्यालेले असेल तर तिथे मात्र भयानक रस मानायचा. मी म्हटले, इथे मुख्य पात्र दुष्यंत आहे. मग रस भयानक का मानायचा? ते म्हणाले, तुम्ही पुरेसे पुरोगामी नाही. नाही तर बेडेकर मानतात म्हणून तसे मानायचे हे मी सांगितले असते. शिवाय परंपरेवर तुमची श्रद्धा नाही. नाही तर अभिनवगुप्त व मम्मट तसे मानतात म्हणून आपण मानायचे असे मी सांगितले असते. मी विचारले, मोठमोठ्या नावांचे आधार घेणे एखादा मुद्दा सिद्ध करावयास पुरेसे आहे, असे तुम्हाला वाटते काय ? कहाळेकर म्हणाले, हा माझ्या वाटण्याचा प्रश्न नसून लोकमत असे आहे. आणि लोकशाहीत बहुमताला मान दिला पाहिजे.
 मी त्यांना विचारले, काव्यातील नायक भ्यालेला आहे असा प्रसंग संस्कृत नाटकात येत नाही काय? ते म्हणाले, चारुदत्त आपल्या अपकीर्तीला भितो असा प्रसंग आहे. पण तिथे भयानक रस मानण्याची प्रथा नाही. ज्या ठिकाणी अनुचित शंगार असतो त्याला रस न म्हणता रसाभास म्हणावे. द्रौपदीवर भाळलेला कीचक इथे कीचक प्रमुख नसूनसुद्धा कीचकाची रती अनुचित आहे म्हणून रतीचा आभास मानायचा, पण सर्व गोपी आपापले नवरे सोडून जेव्हा कृष्णावर भाळतात तिथे मात्र शृंगार मानायचा. कारण कृष्ण परमेश्वर असल्यामुळे ही एरव्ही अनुचित असणारी गोष्ट आता नुसती उचितच झाली नाही तर पवित्र झालेली आहे. मी विचारले, रत्नावली नाटकात रत्नावली उदयनाला पाहताच त्याच्या प्रेमात पडते व भाळून जाते. दुसऱ्या स्त्रीच्या पतीवर असे प्रेम करणे योग्य आहे काय ? महाराज म्हणाले, पुरुषावर कोणतीही स्त्री भाळली आणि ती कुमारिका असली तर त्याला आधीच्या कितीही पत्नी असल्या तरी ते उचित समजायचे. पण विवाहित स्त्रीने दुसन्या पुरुषावर भाळणे अनुचित आहे. विवाहित पुरुषांना हा नियम लागू नाही. मी विचारले, तुम्ही रस पाहात असताना नैतिक प्रश्न उपस्थित करू इच्छिता काय ? कहाळेकर म्हणाले, मी काहीच करू इच्छित नाही. मी फक्त लोक काय मानतात ते सांगतो. मी विचारले, शकाराला वसंतसेनेवर प्रेम करण्याचा हक्क होता. कारण ती गणिका होती. तेव्हा शकाराने केलेला वसंतसेनेचा पाठलाग शृंगार समजावा काय? तेव्हा महाराज म्हणाले, अशा वेळी वसंतसेना हे प्रधान पात्र