पान:अभिवादन (Abhivadan).pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कै. कहाळेकर व रसचर्चा । ६९


अगर अजाणता असो, जीवनाचा एक भाग ओंगळ आणि किळसवाणा आहे या गोष्टीची नोंद भरताने घेतली आहे. याला महत्त्व आहे. हा जीवनाचा ओंगळ भागसुद्धा काव्याच्या कक्षेत येतो. भरताने बीभत्स रस आठ रसांच्या यादीत तर ठेवलेला आहेच, पण त्याबरोबरच चार प्रधान रसांच्या यादीत त्याची गणना केली आहे. जीवनवादी समीक्षेला जीवनात जे सडलेले आहे त्या विषयीची किळस वाचकांच्या मनात जागी करण्याचे कर्तव्य टाळता येणार नाही. आधुनिकांच्या दृष्टीने तर या रसाला महत्त्व आले. मी विचारले, वाचताना किळस येणे याला तुम्ही बीभत्स रस म्हणाल काय ? महाराज म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर देता येणे कठीण आहे. काव्य वाचताना कामवासना जागी होणे याला तुम्ही शृंगार म्हणाल काय ? शेवटी जीवनातल्या कामवासनेपेक्षा आपण शृंगार निराळा मानतो. जीवनातल्या किळसवाणेपणापेक्षा वाङमयातला बीभत्स रस वेगळा मानता येईल. हे वेगळेपण कसे सांगायचे याचा आपण विचार करू. पण ललितवाङमयातला हा एक प्रमुख रस आहे म्हणून तो प्रबंधव्यापी असू शकतो हे मान्य करण्यास आपल्या मनाची तयारी असली पाहिजे.
 डॉ. नांदापूरकरांच्या प्रबंधात एक ठिकाण असे आहे की, भीमाला भयंकर क्रोध येतो, पण तो आपला राग मनातल्या मनात गिळतो. मला संस्कृत परंपरेतील रौद्र रसाविषयी नक्की कल्पना नव्हती. एखाद्या माणसाला राग आला आणि तो त्याने मनातल्या मनात गिळला तर त्या ठिकाणी रौद्ररस आहे ही गोष्ट काही मला समाधानकारक वाटेना. पण नांदापूरकरांनी तिथे रौद्ररस मानलेला होता. आणि आपले म्हणणे बरोबर आहे असा त्यांचा मुद्दा होता. कहाळेकरांच्या समोर मी हा प्रश्न उपस्थित केला. कहाळेकर म्हणाले, रौद्ररसाविषयीची तुमची समजूत मुळातच वेगळी आहे. संस्कृत परंपरेत हा रस निराळ्या प्रकारचा आहे. समजा एखाद्याची प्रेयसी रुसली आणि रागारागाने ती प्रियकराला सोडून दूर जाऊन बसली. या पुढचा प्रसंग प्रियकर प्रेयसीची समजूत घालणार असा येतो. मग हळूहळू राग मावळतो आणि दोघे पुन्हा मूळ पदावर येतात. संस्कृत परंपरेत रागावलेली प्रेयसी हा रौद्ररसाचा भाग आहे. म्हणून या परंपरेचे आद्याचार्य रौद्ररस पाच प्रकारचा मानतात. नोकरावर रागावलेला स्वामी, शिष्यावर रागावलेला गुरू, प्रियकरावर रागावलेली प्रेयसी आणि कुणीही कुणावर खोटया रागाचा आविर्भाव करणे हे सगळे रौद्ररसाचे प्रसंग आहेत. परस्परांच्यावर रागावलेले शत्रू हा रौद्ररसाचा फक्त एक भाग आहे. मी विचारले, गुरूवर रागावलेला शिष्य, स्वामीवर रागावलेला नोकर हेही दोन रौद्ररसात येतील काय ? कहाळेकर म्हणाले, या प्रश्नाचा विचार करावा लागेल. संस्कृत रसव्यवस्थेत हा भोंगळपणा फार आहे. आणि मग ते अशा अनेक गोंधळाची उदाहरणे देऊ लागले.