पान:अभिवादन (Abhivadan).pdf/7

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे(६)

वाचकांना घडावे असाही एक हेतू हा लेख संग्रहित करताना आमच्या डोळ्यांसमोर आहे.
 प्रा. धर्मानंद कोसंबी ह्यांच्या भगवद्गीतेवरील लेखाचे परीक्षण फार पूर्वी 'मराठवाडा' दिवाळी अंकात येऊन गेले आहे. हा लेखही अलीकडच्या वाचकांना उपलब्ध व्हावा म्हणून ह्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला आहे.
 भालचंद्र महाराज कहाळेकर हे कुरुंदकर गुरुजींचे गुरू. त्यांच्यावर त्यांनी एकूण पाच लेख लिहिले. त्या पाचही लेखांचे स्वरूप त्या त्या लेखातील विषयामुळे वेगवेगळे आहे. ह्या ठिकाणी घेण्यात आलेला लेख प्रतिष्ठान मासिकाच्या 'भालचंद्रमहाराज कहाळेकर विशेषांकातील' आहे. भालचंद्रमहाराज कहाळेकर ह्यांच्याशी झालेल्या रसचर्चेचे इथे विवेचन आहे. पदवी परीक्षेसाठी काव्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा लेख कुरुंदकर गुरुजींच्या ह्या लेखातील शैलीमुळे उपयोगी ठरू शकेल, असे वाटते.
 श्री. ग. त्र्यं. माडखोलकर ह्यांच्यावरील लेख म्हणजे त्यांच्या 'श्रद्धांजली' पुस्तकाला गुरुवर्य कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावना आहे. हा लेख म्हणजे ग. त्र्यं. माडखोलकरांच्या केवळ कादंबऱ्यांचे समालोचन करणारा लेख नव्हे. माडखोलकर ज्या राजकीय वर्तुळात वावरत होते त्यामुळे त्यांचा आणि मराठवाड्याचा एक जुना ऋणानुबंध होता. मराठी साहित्यिकांपैकी हैद्राबाद मुक्तिसंग्रामाशी ज्यांचा जवळून परिचय होता असे लेखक फार थोडे. माडखोलकर हे त्या लेखकांपैकी एक. त्यांच्या श्रद्धांजली ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचे निमित्त साधून कुरुंदकर गुरुजींनी माडखोलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देत त्यांना अभिवादन केलेले आहे.
 श्री. अनंत महाराज आठवले हे संत दासगणू महाराजांच्या पीठाचे वारस. ह्या निमित्ताने ते आता मराठवाड्यात स्थायिक झालेले आहेत. अभ्यासपद्धतीत मूलतः मतभेद असूनही अनंतमहाराजांच्या कार्याचे महत्त्व ह्या लेखात विशद करण्यात आलेले आहे. हा लेख माझे मित्र प्रा. अरुण नायगावकर ह्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवून दिला.
 नरहर कुरुंदकर प्रकाशन संस्थेने पाच पुस्तके कायम ग्राहकांना द्यायचे कबूल केले होते. त्याप्रमाणे हा संकल्प इंद्रायणी साहित्य या संस्थेच्या सहकार्याने आम्ही पुरा करीत आणला आहे. कागदाचे वाढते दर आणि मुद्रण व्यवसायातील महागाई ह्यामुळे ही पुस्तके वाचक-सभासदांच्या हाती देताना काहीशी आर्थिक ओढाताण चालू आहे. वितरण व्यवस्थेचा अभाव ह्या कारणामुळेही संस्था बरीच अडचणीत आलेली. अशा अवस्थेत इंद्रायणी साहित्य प्रकाशन संस्थेचे श्री. शाम कोपर्डेकर ह्यांनी सहकार्याचा हात देऊ केला. ह्या पाच पुस्तकांनंतरही गुरुजींची ४-५ पुस्तके