पान:अभिवादन (Abhivadan).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कै. कहाळेकर व रसचर्चा । ६५


नेमके म्हणणे काय आहे, यावर पहिला वाद होऊ शकतो. या त्यांच्या प्रतिपादनात काही अंतर्गत सुसंगती, विसंगती आहे काय, हा दुसरा वाद होतो. आणि कुणाची कोणती मते आपल्याला पटतात हा तिसरा वाद होतो.
 मराठीत रमव्यवस्थेचे जे स्पष्टीकरण आले आहे ते त्यांना पुरेसे समाधानकारक कधीच वाटत नसे. त्या काळी अजून ग. त्र्यं. देशपांडे यांचे 'भारतीय साहित्यशास्त्र' प्रकाशित झालेले नव्हते. पुढे जेव्हा ते प्रकाशित झाले त्या वेळी कहाळेकर म्हणत, ग. त्र्यं. देशपांडयांनी मम्मटाची भूमिका चांगली मांडली आहे, पण ही भूमिका भरत, अभिनवगुप्त यांची आहेच असेही नाही आणि ही भूमिका सुसंगत आहेच असेही नाही, पण विसंवादाची जबाबदारी मम्मटावर टाकली पाहिजे. आमच्या आरंभीच्या चर्चाच्या वेळी हा ग्रंथ समोर नसे. चर्चेला मुख्य आधार नेहमी जोगांचे पुस्तक असे. रा. श्री. जोगांनी लोल्लटाची भूमिका सांगताना असे म्हटले आहे की, रस काव्यगत नायकाच्या ठिकाणी असतो. या नायकाच्या अनुभवांनी तो रस व्यक्त होतो. प्रेक्षक नटाच्या ठिकाणी या रसाची कल्पना करतात. महाराज म्हणत, या ठिकाणी पहिला प्रश्न हा विचारायला पाहिजे की, ही लोल्लटाची भूमिका आहे काय ? दुसरा प्रश्न हा विचारायला पाहिजे की, लोल्लट हा भरताचा भाष्यकार आहे म्हणून ही भरताची भूमिका आहे काय ? तिसरा प्रश्न असा की, ही भूमिका सुसंगत आहे काय ? आणि चौथा प्रश्न असा, ती स्वीकारता येईल काय ? मी त्यांना सांगितले, जोग एक भूमिका लोल्लटाची आहे म्हणून सांगतात. ती लोल्लटाची भूमिका आहे काय हे आपण कसे ठरवणार? तुमच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवणार नाही. कारण तुम्हाला लोल्लटाची भूमिका माहीत असण्यासाठी लोल्लट तुमचा समकालीन नव्हे. महाराज म्हणाले, आपण या मुद्द्यात एक तडजोड पत्करू, आणि जुना मम्मट व नवा मम्मट डोळ्यांसमोर ठेवू आणि त्या दोघांचे म्हणणे एक आहे काय, याचा विचार करू. (या ठिकाणी नवा मम्मट हे विशेषण रा. श्री. जोगांचे समजायचे आहे, कारण त्यांच्या ग्रंथाचे नाव 'अभिनव काव्यप्रकाश' म्हणजे नवा काव्यप्रकाश असे होते.) कहाळेकरांनी प्रथम हे दाखवून दिले की, रस काव्यगत नायकाच्या ठिकाणी असतो हे लोल्लटाचे मत मम्मटाने नोंदविले आहे, पण प्रेक्षक तो नटाच्या ठिकाणी आहे अशी कल्पना करतात, हे लोल्लटाला अभिप्रेत नाही. लोल्लटाला अभिप्रेत आहे ते असे की, नट काव्यगत पात्रांशी तद्रूप होतो. या नटाच्या तद्रूपतेमुळे गौणत्वाने नटाच्या ठिकाणीसुद्धा रसाचा आवेश निर्माण होतो. प्रेक्षकांना मुद्दाम रामाच्या भावना नटावर आरोपित करण्याचे कारण नाही. प्रेक्षक नटाला नट म्हणून न पाहता राम म्हणूनच पाहत असतात. म्हणून प्रेक्षक ज्याला रामाच्या भावना मानतात तो नटाचा अभिनय असतो. या अभिनयाशी नट तद्रूप झालेला असतो, असे लोल्लटाचे म्हणणे दिसते. मी विचारले, पण जुना मम्मट