पान:अभिवादन (Abhivadan).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


६४ । अभिवादन



प्रक्रिया आपण मान्य केली पाहिजे. वाङमयाचा वाचकांच्या मनावर होणारा भावनात्मक परिणाम हा शब्दांमध्ये शोधता येत नाही म्हणून काव्याचे सारतत्त्व शब्दामध्ये शोधता येणार नाही. ते सारतत्त्व वाचकांच्या मनावर होणाऱ्या परिणामाच्या स्वरूपात शोधावे लागेल. भाषेच्याद्वारे असा परिणाम वाचकांच्या मनावर का संभवतो, त्या प्रक्रियेचा शोध घ्यावा लागेल. ध्वनी नावाची एखादी शब्दशक्ती मानून आपण मूळ प्रश्नाचे उत्तर न देता प्रश्नाचे उत्तर दिले आहे असा आभास निर्माण होतो.
 वाचकांच्या मनावर काव्याचा भावनात्मक परिणाम होतो हे संस्कृत परंपरेत सर्वमान्यच आहे. या परिणामाचे स्वरूप काय? या परिणामाचे कारण काय ? याची चिकित्सा न करता ती एक शब्दांची शक्ती आहे, असे म्हणणे म्हणजे शोधाचे दरवाजे बंद करणे आहे. काव्य करण्याची शक्ती कवीजवळ असते. त्यावावत एक प्रतिभा नावाची शक्ती आपण गृहीत धरली आणि कविमनाचा शोध करण्याची जवाबदारी टाळली. कवी जी शब्दरचना करतो त्याच्या भावनात्मक परिणामाचे कारण ध्वनी नावाची शक्ती आपण गृहीत धरून भाषेच्या प्रक्रियेचा शोध घेण्याची जवाबदारी आपण टाळली. यापुढे जाऊन रसिकता ही भावयत्री प्रतिभाच आहे व ती एक शक्ती आहे, असे सांगून आस्वादप्रक्रियेचा शोध घेण्याची जबाबदारी आपण टाळतो आहोत. शक्तीची कल्पना नवीन शोधाच्या शक्यता कुंठित करणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मी विचारले, आज तरी आपण कविमनाचे आणि आस्वादप्रक्रियेचे स्वरूप उलगडून दाखवू शकू काय ? महाराज म्हणाले, एक तर पूर्ण सत्य आजच समजावून सांगा म्हणजे पुढे शोध घेण्याची गरज संपली किंवा त्या ठिकाणी एखादी शक्ती माना, म्हणजे शोध घेण्याची गरज संपली, ही प्रवृत्ती ज्ञानाच्या विकासाला उपकारक नाही. जे ज्ञात आहे ते आपण समजून घेतले पाहिजे आणि अजून जे अज्ञात आहे त्याच्या शोधाला दारे मोकळी ठेवली पाहिजेत.
 ध्वनीच्या सिद्धांताने रसचर्चेत फार मोठी भर घातली आहे, असे त्यांना वाटत नसे. ते म्हणत, ज्याला आपण रसचर्चेत ध्वनिसिद्धान्ताने घातलेली भर असे समजतो तिचे स्वरूप नगण्य आहे. कारण रस हा शब्दांचा आणि त्याच्या अर्थाचा भाग आहे, असे प्राचीनांचे कधीच गंभीरपणे म्हणणे नव्हते. रसचर्चेतील विवाद्य मुद्दे वेगळेच होते. या रसचर्चेच्या संदर्भात वाकड्या-तिकड्या पद्धतीने जाऊन त्यांनी वेळोवेळी काही तथ्ये माझ्या गळी उतरविली. कहाळेकर म्हणत, या रसचर्चेत खरा महत्त्वाचा प्रश्न रसविषयक कुणाची भूमिका हा आहे. कारण सर्वांचीच भूमिका एक नाही. प्रत्येकाची भूमिका निराळी. म्हणून रसचर्चा स्वीकारताना अगर नाकारताना आपण कुणाची भूमिका नाकारतो आहोत, हे स्पष्ट असले पाहिजे. ढोबळपणे रसकल्पना मला मान्य आहे अगर नाही ही चर्चा करण्यात अर्थ नाही. प्राचीनांचे