पान:अभिवादन (Abhivadan).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कै. कहाळेकर व रसचर्चा । ६३


केला पाहिजे.
 माझी धडपड अशी असे की, कहाळेकरांनी आपल्याला काही तरी निश्चित सांगावे. त्यांची धडपड अशी आहे की, माझ्यासमोर नानाविध बाजू आणि शंका उपस्थित कराव्यात, आणि त्याची चर्चा करताना मला विचार करण्यास शिकवावे. ध्वनीचा विचार मांडताना प्राचीन काळच्या संस्कृत साहित्य-शास्त्रज्ञांपासून अर्वाचीन भाष्यकारापर्यंत प्रत्येकाच्या मनात ध्वनीसिद्धांत मांडताना कोणता गोंधळ निर्माण झालेला आहे हे माझ्या लक्षात आणून देण्याचा कहाळेकरांचा प्रयत्न असे. ध्वनिसिद्धान्ताचे पुरस्कर्ते आनंदवर्धन यांच्यावर व्याकरण संप्रदायाचा फार मोठा प्रभाव होता. कळत नकळत सर्वच संस्कृत लेखकांच्या मनावर हा वैय्याकरणाचा प्रभाव पडलेला असतो. वैय्याकरण आपले शास्त्र शब्दाच्या अनुशासनाचे समजत व म्हणून त्यांच्या विचारांचा आरंभ शब्दविचारापासून होई. काव्यवाचनात हे नेहमीच जाणवत आले की, काव्याचा परिणाम जो मनावर होतो त्याचे स्वरूप भावनासदृश आहे. हा काव्याचा होणारा परिणाम शब्दाच्या सर्वसामान्य अर्थात शोधता येत नाही. म्हणून ध्वनिकारांनी ध्वनीची कल्पना मांडली आहे. पण ही मांडीत असताना शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये असणारी सुचविण्याची शक्ती आणि भाषेत असणारी भावनात्मक परिणाम करण्याची शक्ती ही त्यांनी एकसारखीच गृहीत धरली आहे. शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे वस्तू सुचविल्या जातात. वस्तुवाचक अर्थ सुचवला जातो. अलंकार सुचविले जातात. हा भाषेचा पर्यायाने बोध करून देण्याचा सबंध वापर काव्याच्या बाहेरही घडणार आहे. या वापराला वस्तुध्वनी आणि अलंकारध्वनी म्हणून ध्वनिसंप्रदायाने मान्यता दिल्यामुळे कवितेतील भावनात्मक अर्थ जाणवणे आणि भाषेतील सूचक अर्थ ज्ञात होणे या दोन प्रक्रियांची संस्कृत साहित्यशास्त्रात परस्पर सरमिसळ झाली आहे. यामुळे ध्वनिसंप्रदाय नेमके काय सांगतो यावाबत निश्चित भूमिका घेणे कठीण आहे.
 कहाळेकर म्हणत, जेव्हा आपण शब्दशक्तीचा विचार करतो त्या वेळी पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की, शब्दांची शक्ती ही अर्थ निर्माण करणारी आहे, की अर्थवोध करून देणारी आहे. जर शब्दशक्ती अर्थवोध करून देणान्या असतील तर मग ध्वनी ही शब्दशक्तीसुद्धा अर्थवोधकच मानली पाहिजे. रस हा आधीच सिद्ध झालेला असून हा पूर्वसिद्ध रस शब्दांनी वोधित होतो इतकेच ध्वनिकारांना म्हणता येईल. नेमक्या याच शंकेमुळे भट्टनायकाने ध्वनीची कल्पना अस्वीकारार्ह ठरविली आहे. आणि हे ठरवणे झाल्यानंतर पुन्हा एकदा रसभोगाची भोगशक्ती ही शब्दांची शक्ती आहे इथे तो आला. भाषेचा आद्य घटक शब्द नसतो, तर अर्थनिवेदनासाठी वापरण्यात येणारे वाक्य असते आणि हा वाक्याचा वापर वैचारिक पातळीवर आणि भावनात्मक पातळीवर अर्थबोधक असतो, तसा अर्थनिर्माता असतो. अशी दुहेरी