पान:अभिवादन (Abhivadan).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


५४ । अभिवादन



ग्रंथाची रचना झालेली आहे.
 (कोसंबींनी श्रीकृष्णाचा मातृसत्तेशी जोडलेला संबंध मला अनैतिहासिक वाटतो. कारण महाभारतीय कृष्ण गोपींशी क्रीडा करणाराही नाही, त्याच्या बाजूला राधाही नाही, तो वृन्देचा पतीही नाही आणि सोळाहजार बायकांचा नवराही नाही. मूळ कृष्ण यादव. गणतंत्राचा एक नेता आहे. या श्रीकृष्णावर विविध प्रकारच्या शृंगारांचे रंग उत्तरकालात चढविले गेले. त्यांचा संबंध वैष्णवांच्या मधुराभक्तीशी आहे. या कहाण्यांना इ. स. पू. परंपरा नाही. म्हणून मूळच्या कृष्णाचा मातृसत्तेशी संबंध जोडणारा फारसा पुरावाच नाही.)
 भगवद्गीतेतील एक बाब मात्र आपल्या काळाच्या गरजा पूर्ण करणारी होती. आणि ती बाब म्हणजे अनन्यभक्ती. ज्या कुणी हा ग्रंथ बनवला असेल त्याने अनन्यभक्तीच्या या एका कल्पनेत प्रत्येक घटनेचे जणू काही समर्थनच दिलेले आहे. ज्या काळात संपूर्णपणे केंद्रित सत्ता असणारी साम्राज्ये उदयाला येऊ लागतात, त्या काळात एकनिष्ठ, अनन्यभक्तीला फार मोठे महत्त्व असते. शेतकऱ्यांनी ग्रामप्रमुखावर, ग्राम-प्रमुखांनी जहागीरदारावर, आणि सरदार, जहागीरदार, सुभे. दारांनी सम्राटावर अनन्यभक्ती ठेवणे, हेच सर्वांत मोठे पुण्य आहे, ही स्वामिभक्ती मोक्षप्रद आहे ही कल्पना सामंतशाही आणि सरंजामशाही क्रमाने वाढवीत नेते. मनुस्मृतीच्या वेळी सामंत हा शेजारी राजा होता. हर्षोत्तर काळात सामंत सुभेदार ठरला. खालपासून वरपर्यंत समाजकारणात स्वामिनिष्ठा आणि धर्मकारणात अनन्यभक्ती या सूत्रांवरच ते जीवन उभे आहे. हा हर्षोत्तर मध्ययुगात राजा मेला म्हणून आत्मघात करून घेणान्यांच्या कहाण्या शिलालेखात आहेत. कागदपत्रात आहेत, मार्कोपोलोच्या प्रवास-वर्णनात आहेत. भक्तीची कल्पना सरंजामशाही युगाचा कणाच असते. वैभवशाली राजवाडा हे स्वामिभक्तीचे केंद्र; ऐश्वर्यमान देऊळ हे भक्तीचे केंद्र; राजा हा विष्णूचा अवतार; देवासाठी आई, बाप, बहीण, भाऊ, पती, पुत्र सोडावे हा धर्म. स्वामिभक्तीसाठी तेच करावे हे राजकारण. मग या युगातील कनोजचा मंत्री असो की यादवांचा मुख्यमंत्री असो, ते व्रतमाहात्म्याचेच ग्रंथ लिहिणार. या सामंतशाही विरुद्धची एक प्रतिक्रिया म्हणून महानुभावांच्या व वारकऱ्यांच्या चळवळीकडे पाहिले पाहिजे. विशेषेकरून वारकरी, भक्तिमार्गाचाच पुरस्कार करीत होते; पण ते देऊळ आणि त्याची दास्यभक्ती याचा अवलंब करीत नव्हते. पापयोनी असणारे स्त्री, वैश्य, शूद्र कुणीही असोत त्यांचा मी उद्धार करतो ही कल्पना ज्ञानेश्वर पार बदलून टाकतो. तो म्हणतो, 'क्षत्रियत्व, स्त्रीत्व, शूद्रत्व, वैश्यत्व या कल्पना कुठवर ? जोवर परमेश्वराच्या आराधनेत ही माणसे येत नाहीत तोपर्यंत. एकदा ईश्वराशी जवळीक झाली म्हणजे सगळे ईश्वरच होतात.