पान:अभिवादन (Abhivadan).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्रो. कोसंबी आणि भगवद्गीता । ५३


पुन्हा अवताराची ही कल्पनाही वेदोपनिषदांना अज्ञातच होती.
 एकदा नारायणीय भक्तिमार्ग वाढू लागल्यानंतर वेगवेगळया परपरांच्या कथा एका कृष्णात एकत्र आणल्या गेल्या. वालक्रीडा करणारा खोडकर कृष्ण, सोळा हजार बायका करणारा कृष्ण, राजकारणी कृष्ण, योद्धा कृष्ण अशा वेगवेगळया परंपरा कृष्णाच्या नावाखाली दिसतातच. कृष्णाच्या सोळा हजार बायका या बहुधा मूळच्या मातृसत्तेतील देवता असाव्यात. हा समन्वयाचा प्रकार इतर देवांच्या बाबतीतही दिसतो. पार्वती ही महिषासुरमर्दिनीही आहे. हा महिषासुर 'म्हसोवा' या नावाने देवही आहे, तो शंकराचा अवतारही मानला जातो. त्याची पत्नी जोगाबाई ही आहे. शैवांनी नाग शंकराच्या गळ्यात अडकवले आहेत. गाणपत्यांनी गणपतीच्या हातात नाग दिला आहे. वैष्णवांचा विष्णू तर नागावरच झोपतो. सिंधू संस्कृतीतील पूजनीय वृषभ पुढे शंकराचे वाहन झाले आहे. हे जसे समन्वयाचे वेगवेगळे प्रकार त्याचप्रमाणे नानाविध परंपरा एका कृष्णात आणणे हाही समन्वयाचा प्रकार आहे.
 ज्या वेळी जीवनात संघर्ष कठोर नसतो त्या वेळीच समन्वय शक्य होतो. ज्याप्रमाणे हर्ष एकाच वेळी गौरी, शिव, सूर्य, यांचा पूजक आहे, शिवाय तो बुद्धाचा मित्रही आहे. हर्ष हा समन्वय करू शकला, पण त्याचा शत्रू नरेंद्रगुप्त शशांक मात्र बौद्धांची मंदिरे लुटीत होता. काश्मीरातील एक राजा हर्ष याने तर 'देवोत्पवन नायक' या नावाचा एक मंत्री नेमून देवळे फोडणे व देवता लुटणे हे कार्यच पद्धतशीरपणे केले. आणि तरीही काश्मीरी हर्ष विद्यांचा चाहता सुसंस्कृत माणूस होता. हे असे का घडते याचा विचार केला पाहिजे. तेव्हा जीवनात संघर्ष तीव्र असतो, त्या वेळी समन्वय शक्य नसतो. काश्मीरी हर्षाला पैसा गोळा करणेच आवश्यक होते. नवा सरंजामदार वर्ग जन्माला घालणेच आवश्यक होते. त्याशिवाय तो टिकूच शकला नसता. देवळे फोडण्याच्या मागे काश्मीरी हर्षाचा धर्मद्वेष नव्हता. तो देवळात जमा झालेली प्रचंड संपत्ती ताब्यात घेऊ इच्छित होता. गीता हे नानाविध विचारांच्या व भूमिकांच्या समन्वयाचे पुस्तक आहे. कृष्ण ही अशीच समन्वयाची देवता आहे. मग हा समन्वय संघर्ष तीव्र नसलेल्या काळात म्हणजे गुप्तकाळात केव्हा तरी झाला असावा, असे तर्कत: वाटू लागते. अकबर गादीवर आला म्हणजे तो समन्वयाचे प्रयत्न करू लागतो. इराणशी लढताना, आसाममध्ये लढताना सगळे खजिने रिकामे पडू लागले म्हणजे औरंगजेव समन्वयाचा नाद सोडून जिझीयासारखे नवे कर बसवतो. तत्त्वज्ञानाची गरज आणि मार्गदर्शनाची गरज संघर्षकाळात असते. समृद्धीच्या काळाला मार्गदर्शनाची गरजच नाही. गीता समृद्धीच्या काळाचे अपत्य आहे- याचा अर्थच हा की, ज्या वेळी तिची अजिबात गरज नव्हती त्या वेळी या