पान:अभिवादन (Abhivadan).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्रो. कोसंबी आणि भगवद्गीता । ५१


पायाखाली तुडवल्याचे वर्णन ऋग्वेदात आलेलेच आहे. या पात्राचे कौतुक वामदेव करतो. अजातशत्र आपल्या पित्याला कैद करतो आणि हा पिता तुरुंगातच मरतो. बौद्धांनी, जैनांनी आणि वृहदारण्यकोपनिषदात वैदिकांनी या अजातशत्रूची शहाणा आणि योग्य राजा म्हणून स्तुतीच केलेली आहे. स्वतः कृष्णाने आपला मामा मारलेलाच होता. मथुरेत जर मातृसत्ता असेल तर या हत्येवर थोडा निराळाच प्रकाश पडतो. कारण मातृसत्तेत बहिणीचा मुलगा गादीचा वारस होतो. खरे म्हणजे राजनीतीचा आणि तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्याला योग्य असे पात्र महाभारतात भीष्म होते. राजधर्म, आपद्धर्म आणि मोक्षधर्म या तिन्ही विभागांत प्रचंड उपदेश भीष्माच्या तोंडी शांतिपर्वात आणि पुन्हा अनुशासनपर्वात आलेला आहे. प्रत्येक वेळी कपटविद्येचा आश्रय घेणारा कृष्ण हा कौटिल्य अर्थशास्त्रातल्या राजनीतिज्ञाप्रमाणे गरज पडेल तेव्हा विजय होण्यासाठी कपटाचा आश्रय करणारा राजकारणी पुरुष आहे. हा कृष्ण आधी परमेश्वर झाल्याशिवाय आणि त्याची सर्व कपटविद्या ईश्वरीलीला ठरल्याशिवाय तात्त्विक आणि नैतिक उपदेश कृष्ण करूच शकत नाही. भगवद्गीतेचा उवाच' कृष्ण किंवा वासुदेव उवाच नाही तो भगवान उवाच' आहे. कृष्ण आधी परमेश्वर ठरतो आणि मग भारतात भगवद्गीतेचा समावेश होतो.
 ज्या काळात महाभारत घडत होते त्या काळात कृष्णभक्तीचा संप्रदाय क्रमाने उदयाला येत होता. हा काळ म्हणजे भारतीय युद्धाचा काळ नव्हे; तर ग्रंथ घडण्याचा काळ आहे. या काळात कृष्ण ही देवता नानाविध संप्रदाय व परंपरा यांच्या समन्वयांतून घडत होती. ही प्रक्रिया भारतीय वाङमयात सतत घडतच जाते. दोनशे वर्षांपूर्वीचा वंगालमधील एकपीर सत्यपीर होतो. रामेश्वर भट्टाचार्याने या सत्यपीराची कथा लिहिली आहे. फार थोड्या अवधीत हा सत्यपीर सत्यनारायण होऊन हिंदुस्थानभर पसरतो. ही घडामोड तर अगदी अलीकडची आहे. हाच प्रकार कृष्णाच्याही बाबतीत घडला. वेदात विष्णू ही देवता आहे; पण नारायण नाही. नारायण हा शब्द पाण्यात झोपणारा या अर्थाचा आहे. नारा म्हणजे पाणी हा शब्दही आर्य भाषा कुलातला नाही. मेसेपोटेमियातील मत्स्य जसा पुढे हिंदू संस्कृतीने आत्मसात केला त्याचप्रमाणे मेसेपोटेमियातील इ ऊर्फ एन्की ही पाण्यात झोपणारी देवता नारायण म्हणून हिंदूंनी आत्मसात केलेली दिसते. महाभारतातच वनपर्वात ज्याने सर्व जग व्यापले आहे अशा नारायणाची कथा आलेली आहे. पण तिथे कृष्णाचा उल्लेख नाही. वनपर्वातील जगत व्यापणारा नारायण, भगवद्गीतेतील विश्वदर्शन दाखवणारा कृष्ण हा पुढे विष्णशी जोडण्यात आला. पाण्यात झोपण्याचे कार्यही एकदा विष्णू करू लागल्यावर कृष्ण हा विष्णूचा अवतार ठरणे फार सोपे गेले. श्रुतींच्यामध्ये प्रतर्दन दिवोदासी याला इंद्र म्हणतो, 'फक्त मला जाण, जो