________________
अध्याय हा स्वतंत्ररीत्या नंतर आला. ७ ते १७ हेही अध्याय क्रमाक्रमाने वाढत गेले असे दिसून येईल. ज्या ज्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाने प्रश्न न करताच आपणहून काही सांगण्याचा प्रयत्न केला तिथपासूनचे सलग तुकडे ही भगवद्गीतेत पडलेली उत्तरकालीन भर आहे, असे मला वाटते. गीताग्रंथातील भर पडणारा हा शेवटचा थर भक्तिमार्गाला प्राधान्य देणारा गुप्त आणि गुप्तोत्तरकालीन थर आहे, म्हणून माझ्या मते पहिला टप्पा अर्जुनाचा मोह नाही, गीताही नाही हा. या टप्प्यात २२० या अध्यायानंतर ४१ वा अध्याय असावा. दुसरा टप्पा अ. १, २, ३ किंवा १, २, ५, ६. तिसरा टप्पा अ. १ ते ११ किंवा अ. १ ते १४ आणि चौथा टप्पा अठरा अध्याय अशी गीतेची वाढ झाली असावी. म्हणजे मग पहिल्या टप्प्यातील गीतेत सांख्य की योग, ज्ञान की कर्म एवढाच प्रश्न शिल्लक राहतो. आणि हा प्रश्न ऐतिहासिक पद्धतीने ध्यानात घ्यायचा तर ब्राह्मण की उपनिषद, पूर्वमीमांसा की उत्तरमीमांसा असा आहे. इ. स. च्या पूर्वी पहिल्या दुसऱ्या शतकात कृष्ण परमेश्वर ठरल्यावर त्याच्या तोंडी गीता आली. चौथ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत गीतेत भक्तिमार्ग आला आणि आठव्या शतकापासून आजतागायत प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार तत्त्वज्ञान गीतेतून काढले असे याबाबत माझे म्हणणे आहे. हे म्हणणे तत्त्वतः कोसंबीचे म्हणणे असले तरी तपशिलाबाबत थोडे भिन्न आहे.)
आमच्या पुराण परंपरेप्रमाणे असा एखादा तत्त्वज्ञानपर संवाद पुराणात घालणे यात कुणालाच काही गैर वाटत नव्हते. आम जनतेत लोकप्रिय असणाऱ्या पुराणकथांच्यामधून मांत्रिकांनी आपल्याला सोयिस्कर असलेले संवाद घातलेले आहेत. त्यांपैकीच भगवद्गीता हा एक संवाद म्हणता येईल. सगळे शांतीपर्व व अनुशासनपर्व या प्रकारच्या प्रक्षेपांनी भरलेले आहे. ज्या वेळी भगवद्गीता अशा रीतीने महाभारतात बसविली गेली त्यानंतरच्या काळात पुन्हा कृष्णाने अर्जुनालाच सांगितलेली अशी एक गीता भारतात आहे. ही गीता अश्वमेधिक पर्वात आलेली असून अनुगीता या नावाने प्रसिद्ध आहे. अनुगीतेत फक्त ब्राह्मणांचे मोठेपणच विस्ताराने सांगितलेले असल्यामुळे भगवद्गीतेत ह्या पुरोहितवर्गाला नेमके काय कमी वाटत होते हे स्पष्टपणे उघड होते. ब्राह्मणांनी आपले महत्त्व वाढविणारी ही अनुगीता मुद्दाम ईश्वराच्या तोंडी अश्वमेधिक पर्वात घातली याचा अर्थच भगवदगीताही अशीच आली आणि आल्यावर काही काळ तरी सर्वमान्य होऊ शकली नाही असा होतो.
खरोखरी भारतातील क्षत्रियांना गीतेतील उपदेशाची गरजच नव्हती. कर्तव्य असेल तर भाऊ मार, बापाचा वध कर, सर्व नातेवाइकांचा वध कर, जोवर माझ्यावर श्रद्धा आहे तोवर सर्व पापे क्षमा केली जातील हे क्षत्रियांना सांगण्याची गरजच नव्हती. ऋग्वेदकाळापासून क्षत्रिय हे करीतच होते. इंद्राने आपला बाप