________________
आहे. यामुळे गीतेचा उगम गुप्तपूर्वकाळात गृहीत धरावा लागतो तसा वौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक मांडणीच्या नंतरचा समजावा लागतो.
सर्वच पुराणे आणि महाभारत यांना गुप्तकाळात नव्याने संस्करण मिळाले आणि या काळाच्या थोडे पूर्वी सर्व भारतग्रंथभर भृगु कुळातील ब्राह्मणांनी मोठया प्रमाणात भार्गव कथा प्रक्षिप्त केल्या ही गोष्ट सर्वज्ञात अशीच आहे. पुराणात अजून गुप्त हे अनुगांग आणि प्रयाग या ठिकाणी राज्य करणारे स्थानिक राजे म्हणूनच ज्ञात होते. त्यांना गुप्त साम्राज्य माहीत नव्हते. म्हणजे हा संस्करणाचा काळ ऐन गुप्ताच्या आरंभीचा दिसतो. (कोसंबीची ही भूमिका वादग्रस्त आहे. कारण मला हा उल्लेख मध्यवर्ती गुप्त साम्राज्य संपल्यानंतरचा म्हणजे सहाव्या शतकातला वाटतो. चंद्रगुप्तापूर्वी फार दीर्घकाळ स्थानिक राजे म्हणून गुप्त घराणे नव्हते. पण स्कंद गुप्तानंतर दीर्घकाळ अनुगांग व प्रयाग गुप्तांच्या ताब्यात होते. म्हणजे संस्करणाचा काळ कोसंबी मानतात तसा चौथे शतक नसून सहावे शतक हा ठरतो.) गीतेविषयीचा पहिला उल्लेख अप्रत्यक्षपणे हयूएन्त्सांगमध्ये सापडतो. हयूएन्त्सांग म्हणतो की, युद्ध आरंभ करण्यासाठी राजाच्या आज्ञेवरून एका ब्राह्मणाने एक ग्रंथ रचला व तो नंतर महाकाव्याचा जुना भाग म्हणून नावाजला गेला. यूएन्त्सांगचे मत आपण बाजूला ठेवले तरी अश्वलायन गीसूत्राच्या वेळी भारत आणि महाभारत दोन्हींचेही अस्तित्व होते ही गोष्ट उघड आहे. अजून महाभारताची विभागणी पर्वसंग्रहाप्रमाणे शंभर पर्वांत होती. त्यांना उपपर्व करून अठरा पर्वात नत्री मांडणी नंतर झाली. या जुन्या भारत ग्रंथात गीता असण्याचा संभव फार कमी आहे. पण गीतेतील 'जगलास तर राज्य भोगावयास मिळेल, मेलास तर स्वर्ग मिळेल,' यासारखा भाग मळ भारतात असावा. कारण कौटिल्य अर्थशास्त्रातसुद्धा युद्धारंभी अशा प्रकारे सैन्याला प्रक्षोभित करावे यांची नोंद झालेली आहे. शेवटी सेना समोरासमोर आल्यानंतर, उभय बाजूंनी शंख वाजविल्यानंतर मध्येच तीन-चार तास थांबून तत्त्वज्ञान-चर्चा करणे केव्हाही अशक्यच होते. पण तरीही हा ग्रंथ महाभारतात आला.
स्पष्टपणे सांगायचे तर सर्व विचारसंप्रदाय एकत्रित करून वरिष्ठ वर्गाला मिळतेजुळते करून घेण्याचे सामर्थ्य हेच गीतेचे महत्त्व आहे आणि म्हणन गीतेत परस्परविरोधी घोषणा सुखाने नांदू शकतात. ग्रंथभर अहिंसेचे महत्त्व गाणारा हा ग्रंथ युद्धाला उद्युक्त करणारा आहे हा विसंवाद गीतेत बोचत नाही, कारण एकदा कर्तव्यकर्म लढणे हे मान्य केल्यानंतर आणि मी करतो ही अहन्ता सोडली की, हिंसेचा परिणामच होत नाही. देह मरणारच असल्यामुळे किती देह मारले गेले याला काहीच महत्त्व उरत नाही. आणि आत्मा न मरणारा असल्यामुळे मरणेमारणेच मिथ्या होऊन जाते. शिवाय सगळे भगवंतांनी आधीच मारून ठेवलेले होते.