पान:अभिवादन (Abhivadan).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्रो. कोसंबी आणि भगवद्गीता । ४७



दक्षिणेत थोडाफार जैनांना राजाश्रय होता. बौद्ध धर्म वज्रयानी स्वरूपात तिबेटात मूळ धरून होता. भारतात त्याचे वर्चस्व आधीच संपलेले होते.)
 भगवद्गीता हे परमेश्वराचे गीत वरिष्ठ वर्गीयांचे आणि ब्राह्मणांचे आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. गीतेतील कृष्ण म्हणतो, "जे मला शरण येतील ते मग स्त्री असोत, वैश्य असोत, शूद्र असोत त्या सर्वांचा उद्धार होईल." या ठिकाणी पापयोनी असा एक शब्द आलेला आहे. भाष्यकार स्त्री, वैश्य, शूद्र आणि पापयोनी असे चार गट पाडतात. पण वरील श्लोकाचा अर्थ तसा दिसत नाही. स्त्री, वैश्य, शूद्र हेच पापयोनी आहेत असा या श्लोकाचा अर्थ दिसतो. एकीकडे भगवान कृष्ण चातुर्वर्ण्य मी निर्माण केलेले आहे असे सांगतात. हे चातुर्वर्ण्य गुणविभाग आणि कर्मविभाग पाहून परमेश्वर निर्माण करतो. जे वैश्य, शूद्र वर्णात जन्मलेले आहेत त्यांचा आधीच्या जन्मीचा गुण-कर्मविभाग तसा होता हा याचा अर्थ होतो हे ध्यानात घेतले पाहिजे. म्हणजे परमेश्वर तुम्हाला गतजन्मीच्या पापामुळे शूद्र करणार, हे शासन स्वीकारून शूद्रांचे विहित कर्म प्रामाणिकपणे आचरून पुन्हा त्या परमेश्वरालाच नम्रतेने शरण जावे म्हणजे उद्धार होतो, ही गीतेची भूमिका आहे. या भूमिकेत कनिष्ठ वर्गांनी बिनतकार आपले दारिद्रय भोगून वरिष्ठ वर्गाला साथ द्यावी हा उपदेश गृहीत आहेच. अशा प्रकारचा उपदेश परस्परांचे हितसंबंध सांभाळणाऱ्या ब्राह्मण-क्षत्रियांच्याकडूनच होण्याचा संभव असतो. नैतिक उपदेश एकाएकी शून्यातून निर्माण होत नाहीत. त्यांच्याही पाठीशी काही सामाजिक गरजा असतातच. अन्नधान्य निर्माण करणाऱ्या समाजात वरिष्ठ वर्गाला यासारख्या उपदेशाची गरज लागते. गीतेत मागचे सर्व संप्रदाय आणि विचारसरणी मोठ्या कौशल्याने वरिष्ठ वर्गाच्या गरजेला मिळत्याजुळत्या करून घेऊन समन्वित केलेल्या दिसतात. पूर्व मीमांसकांचा आवडता यज्ञ जर सोडला तर स्पष्टपणे इतर कोणत्याही भूमिकेचा निषेध गीतेत आलेला नाही. अनेक जन्म घ्यावेत, दर जन्मात मागच्या जन्मीची पापे फेडावीत. आश्रमधर्माची चौकट व वर्णव्यवस्थेची चौकट पाळून नवे पाप घडू देऊ नये, या पुण्याच्या जोरावर मोक्ष मिळवावा ही कल्पना उपनिषदांची नव्हे. या कल्पनेचा उगम बौद्ध धर्मात आहे. गीतेत कर्माची जी मांडणी केलेली आहे ती सारी बौद्ध धर्मावरून उचललेली आहे. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी जे स्थितप्रज्ञ दर्शन आलेले आहे, त्याची भूमिका त्यातील ब्रह्मनिर्वाण' हा शब्द हीसुद्धा बौद्धांची उचल आहे. अहंता सोडून देऊन कर्म करावे म्हणजे कर्माचा भोगरूप परिणाम टाळता येतो आणि निर्वाण मिळवता येते ही बौद्धांचीच भूमिका आहे. हा पुरावा लक्षात घेतला तर गीताग्रंथाचा उगम इ. स. दीडशेच्या नंतर आणि गुप्तपूर्वकाळात झाला असला पाहिजे हेही स्पष्ट होते. भगवद्गीतेची भाषा गुप्तांच्या अभिजात संस्कृतला मिळतीजुळती आहे. पण गीतेतील त्रिष्टुभ छंद हा अधूनमधून अनियमित