पान:अभिवादन (Abhivadan).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


४० । अभिवादनबुद्धीचा परिणाम त्यांनी केलेल्या इतिहास संशोधनावरही झालेला आहे. सिंधू संस्कृतीपासून अगदी आधुनिक काळापर्यंत त्यांच्या इतिहासविषयक संशोधनाचा व्याप होता. संस्कृत, पाली या भाषांचे बारकाईने ज्ञान; फ्रेंच, जर्मन, रशियन आणि इंग्रजी या विभागांत चालू असणाऱ्या प्रचंड संशोधनाचा गाढ परिचय; व्यापक ऐतिहासिक दृष्टिकोण आणि गणिती पद्धतीने बारीकसारीक तपशिलावर बोट ठेवण्याची त्यांची पद्धत. यांमुळे त्यांच्या ऐतिहासिक संशोधनाला फार मोठा दर्जा प्राप्त झालेला होता. इतिहास संशोधनात विशेषेकरून नाण्यांचा त्यांनी केलेला अभ्यास यामुळे तर नाणकशास्त्राच्या अभ्यासाला एक नवीन दिशा प्राप्त झाली. वैज्ञानिक आणि गणितज्ञ इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात प्रवेश करतात त्या वेळी त्या संशोधनाच्या कक्षा नव्या दिशेने विस्तार पावतात असा अनुभव आहे. आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या बाबतीत या विषयीचा हा अनुभव आलेला होताच. या अनुभवाची पुनरावृत्ती कोसंबी यांच्या नाणेविषयक संशोधनाने झाली, असे माझे प्रामाणिक मत आहे. हा नाण्यांचा अभ्यास करीत असताना कोसंबींनी ४००० नाण्यांची अतिशय बारकाईने सुमारे बारा हजार वजने घेतली. आणि या नाण्यांच्यावर वापराचा परिणाम हुडकून काढला. नाण्यांचा अभ्यास त्यांवरच्या ठशामुळे राजे व त्यांचा काळ यासाठी होतच होता. ज्या ठिकाणी नाण्यांची उपलब्धी झाली त्याचा उपयोग राज्याचा क्षेत्रविस्तार ठरविण्यासाठी होतच होता. पण नाणी ज्या धातूंची बनवलेली आहेत त्यांच्या अभ्यासावरून धातुविद्येतील तत्कालीन प्रगती आणि वापराचे नाण्यावर झालेले परिणाम यावरून तत्कालीन जीवनात नाण्याचे स्थान, आथिक घडामोडीत त्यांचा वापर, त्यावरून दिसणारी आर्थिक जीवनाची व चढउताराची काही अंगे या विषयीच्या संशोधनाला एक नवीन क्षेत्र व दिशा कोसंबींनी लावून दिली, असे म्हणण्यास हरकत नाही.
 भर्तृहरीच्या शतकत्रयांच्या अभ्यासामुळे विद्वानांचे लक्ष त्यांच्याकडे प्रथम , वेधले गेले. अमरकोशातील शब्दांचा समाजशास्त्रीय अभ्यास आणि सुभाषितरत्नभांडाराला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना इतिहासकारांच्यामध्ये अत्यंत मौलिक चर्चा घडवून आणणारी ठरली. ब्राह्मणांच्या गोत्रांविषयी आणि काश्मीरातील सरंजामशाहीच्या उदयाविषयी कोसंबींनी केलेले विवेचन असेच मूलगामी आहे. पण कोसंबीचे हे. सारे लिखाण प्रामुख्याने वेगवेगळ्या नियतकालिकांतून विखुरलेले आहे. पुस्तकरूपाने त्यातील फारच थोडा भाग संग्रहित झालेला आहे. या त्यांच्या ग्रंथांच्यापैकी भारतेतिहासाच्या अभ्यासाला त्यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे, ती त्या पद्धतीची सर्वांत मौलिक अशी ग्रंथरचना म्हटली पाहिजे. कॉ. डांगे किंवा रूबेन या मंडळींनी मार्क्सवादी विचारसरणीच्या अधिष्ठानावर भारतेतिहासाची मीमांसा करण्याचा यापूर्वी जो प्रयत्न केलेला होता, अगर कॉ.